महाराष्ट्रात सध्या पहिलाच पाऊस सुरु आहे. या पावसाला सुरुवात होवून आठ दिवस होत नाही तेवढ्यात एक वाईट बातमी समोर आली आहे. पावसाळा सुरु होताच यंदाच्या पावसात समुद्रात बुडून तब्बल 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार, रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकू नये, असा आदेश जारी करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, बीचवर पोहण्यास जातात. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असतांना कुणालाही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आलाय.