महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे, पण तरीही भाजपने आतापासूनच कंबर कसायला सुरूवात केली आहे. भाजपच्या मिशन 144 ला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपच्या या मिशनचा शुभारंभ होत आहे. सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या मोरबा विमानतळावर जेपी नड्डा यांचं आगमन होईल.
चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचं जेपी नड्डा दर्शन घेणार आहेत. यानंतर जेपी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर जेपी नड्डा भाजपच्या लोकसभा टीमशी औपचारिक संवाद साधतील. यानतंर ते औरंगाबादकडे रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील.
मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला, त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. याचसह भाजपचं मिशन 144 देखील सुरू होणार आहे. भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले, यानंतर ते भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. भाजपकडून वारंवार 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे, पण आता भाजपने मिशन 144 म्हणजेच विधानसभेत स्पष्ट बहुमताचा नारा दिला आहे. याआधी भाजपला 2014 साली 122 जागांपर्यंत तर 2019 साली 105 जागांपर्यंत पोहोचण्यात यश आलं होतं.