वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. ही घटना पाली येथील राजकीयावासाजवळ घडली. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलं नाही. उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी जयपूर येथील मुख्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर चार गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. यानंतर रेल्वे रुळ रिकामा केला जाईल. त्याचवेळी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे.अपघाताविषयी माहिती देताना एका प्रवाशाने सांगितलं की – “मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर 5 मिनिटांत ट्रेनच्या आत कंपनाचा आवाज आला आणि 2-3 मिनिटांनी ट्रेन थांबली. आम्ही खाली उतरलो आणि पाहिलं की किमान 8 स्लीपर क्लासचे डबे रुळावरून घसरले आहेत. 15-20 मिनिटांत रुग्णवाहिका आली.”
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
जोधपूर : 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646
पाली मारवाड : 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072
प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक कोणत्याही माहितीसाठी – 138 आणि 1072 – या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.