नवीन वर्ष सुरु झालं खरं पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनोरंजन सृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. आज 1 जानेवारी रोजी नांदगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. आज अचानकपणे त्यांची निधनाची बातमी समोर येताच सगळ्यांना धक्का बसला. त्यांच्या जाण्यानं मनोरंजसृष्टीत एक शोककळा पसरली आहे.
मुंबईतील सर्वात जुनी फिल्म सोसायटी ‘प्रभात चित्र मंडळ’, ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ आणि चित्रपट समिक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘फिप्रेस्की’ यांमधे महत्वपूर्ण सहभाग असून रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आणि उत्तम संघटक अशी श्री. सुधीर नांदगावकर यांची ख्याती होती. गेली 56 वर्षे प्रभात फिल्म सोसायटीचे ते काम पाहात होते. ते ठाण्यातील माजीवडा येथे राहात होते.
परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवूड चे चित्रपट या समजातून बाहेर काढून जगभरातील चित्रपटांच्या विविध जागतीक प्रवाहांशी मराठी रसिकांना जोडण्याचे काम सुधीर नांदगावकर यांनी केलं. प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील फिल्म सोसायटी मार्फत त्यांनी येथील सुजाण मराठी रसिकांना तसेच साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रातील जाणकारांना या चळवळीशी जोडले.
दरम्यान, चित्रपटाचा सखोल अभ्यास असणारे सुधीर नांदगावकर यांनी त्यांचं आयुष्य मराठी रसिकांना चित्रपटाशी जोडण्यात घालवलं. आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये परिक्षक म्हणून काम केले आहे. जगभरातील उत्तम चित्रपट मराठी प्रेक्षांनी पहावेत, त्यावर चर्चा कराव्यात यासाठी नांदगावकरांनी फिल्म सोसायटी चळवळीद्वारे खूप काम केलं.