राज्याला साथरोगांचा ‘ताप’! पावसाळा सुरू होताच साथरोगांचा उद्रेक
पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यभरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण सापडले असून, मागील वर्षी त्या तुलनेत त्यात एक हजारहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे.राज्यभरात जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपताना सप्टेंबर महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढू लागतील, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण आढळले. यावर्षी एकाही डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. मागील वर्षी जुलैअखेरीस १ हजार ९८१ रुग्ण सापडले होते तर ६ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. याचबरोबर चिकुनगुनियाचे यंदा २१ जुलैपर्यंत ३२५ रुग्ण सापडले आहेत. मागील वर्षी जुलैअखेरीस ही संख्या ४९३ होती.
‘उद्धव ठाकरेंच्या घरगुती मुलाखतीवर…’, फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस सामनाचे संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणला आहे.’उद्धव ठाकरेंची जी घरगुती मुलाखत आहे, त्यातलं एकही वाक्य प्रतिक्रिया देण्या लायक नाही, त्यामुळे माझा वेळ त्याकरता घेऊ नका’, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे.
जागतिक व्याघ्र दिनीच चंद्रपुरात वाघाचा मृत्यू, अज्ञात वाहनाची धडक
जागतिक व्याघ्र दिनीच चंद्रपूरमध्ये दुःखद घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर-गोंडपिंपरी मार्गावरील कळमना येथे ही घटना घडली आहे. आज दुपारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे.वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आहे. मृत्यू झालेली वाघीण अंदाजे 4 वर्षांची असून रात्रीच्या दरम्यान वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
भिडेंना गांधीद्वेष भोवला, अमरावतीत गुन्हा दाखल
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे आता अडचणीत सापडले असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात त्यांनी अमरावतीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संभाजी भिडे, निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्या इतर आयोजकांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि १५३ (३), ५००, ५०५(२), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरूषांविषयी वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविणे, विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविणारे भाष्य करणे आणि महापुरूषांची बदनामी करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्यात डोळ्याची साथ; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात
राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. राज्यात यंदा २७ जुलैपर्यंत असे ३९ हजार ४२६ रुग्ण सापडले असून, त्यातील ७ हजार ८७१ रुग्ण पुण्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.राज्यात पुण्यानंतर बुलढाण्यात मोठ्या संख्येने डोळ्याच्या साथीचे रुग्ण सापडले आहेत. बुलढाण्यात ६ हजार ६९३ रुग्ण आढळले असून, अमरावती २ हजार ६११, गोंदिया २ हजार ५९१, धुळे २ हजार २९५, जालना १ हजार ५१२, वाशिम १ हजार ४२७, हिंगोली १ हजार ४२५, नागपूर महापालिका १ हजार ३२३, अकोला १ हजार ३०६, यवतमाळ १ हजार २९८, परभणी १ हजार १०९, जळगाव १ हजार ९३ अशी रुग्णसंख्या आहे. सर्वांत कमी रुग्णसंख्या रायगडमध्ये असून, तिथे केवळ एक रुग्ण सापडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ३२४ रुग्ण आढळले आहेत.
मातृभाषेमुळे युवकांशी होणाऱ्या भेदभावावर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
मातृभाषेतील शिक्षण मुलांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी आवश्यक असल्याचं अनेक शिक्षणतज्ज्ञ सांगतात. मात्र, अनेकदा याच मातृभाषेवरून युवकांना दुजेपणाची वागणूक मिळते, भेदभावाला सामोरं जावं लागतं. इंग्रजीत न बोलता मातृभाषेत बोलणाऱ्यांबाबतही पूर्वग्रहदुषित मत बनवलं जातं. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. ते शनिवारी (२९ जुलै) नवी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय संमेलनात बोलत होते.नरेंद्र मोदी म्हणाले, “युवकांबद्दल त्यांच्यातील कौशल्याऐवजी त्यांच्या भाषेवरून मत बनवणे त्यांच्यावरील सर्वात मोठा अन्याय आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने भारतातील युवकांच्या बुद्धिमत्तेबरोबर खरा न्याय होण्याची सुरुवात होणार आहे. हे सामाजिक न्यायाचं महत्त्वाचं पाऊल आहे.”
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आता सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी केली जाऊ लागली आहे. विरोधी पक्षांनीही INDIA या नावाने आघाडी करून भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरावी अशा काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होणार आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र अशा काही महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपानंही कंबर कसली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.भारतीय जनता पक्षाकडून एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस व १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच, तेलंगणा भाजपाचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे.
अमेरिका, युरोपच्या आर्थिक चुकांमुळे महागाई; पुतिन
रशियाच्या युक्रेनविरोधातील लष्करी कारवाईमुळे जागतिक अन्नधान्य दरांत वाढ झाल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळला आणि या समस्येचे मूळ पाश्चिमात्य देशांच्या ‘आर्थिक चुकां’मध्ये हे असल्याचा प्रत्यारोप केला.सेंट पीटर्सबर्ग येथे रशिया-आफ्रिका शिखर परिषदेत पुतीन म्हणाले की, अमेरिका आणि युरोपीय महासंघाने करोना साथ रोगाचा परिणाम म्हणून अन्न खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चलनाचे मुद्रण केल्यामुळे अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी करोना साथीला तोंड देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांकडे पुतिन यांचा रोख होता.
व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना जामीन
भिमा-कोरेगाव येथील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) गेली पाच वर्षे ते अटकेत आहेत.गोन्साल्वीस आणि फरेरा यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असले तरी केवळ त्या एकमेव कारणाच्या आधारे त्यांना जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने नमूद केले. या दोघांचेही बंदी घातलेल्या माओवादी नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय, रोहित-विराट भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर होत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला आणि दुसरा सामनाही जिंकून त्यांना मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात बराच बदल करण्यात आला आहे. या सामन्यात संजू सॅमसन अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
SD Social Media
9850 60 3590