दि.३१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

समान नागरी कायदा आता २०२४ नंतर; तोपर्यंत चर्चेतून वातावरण निर्मिती सुरू राहणार

भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार समान नागरी संहितेचा कायदा याच कार्यकाळात लागू करेल याची शक्यता कमी आहे. सर्वधर्मीय समाजाला लग्न, घटस्फोट, वारसा, दत्तक या संबंधीच्या वैयक्तिक विषयांकरिता एकच नियम समान नागरी संहितेमध्ये प्रस्तावित आहे. समान नागरी कायदा हा भाजपाच्या वैचारिक ध्येयप्राप्तीपैकी एक आहे. कलम ३७० हटविणे आणि अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करण्यासारखी कामे याआधीच पूर्ण झाली आहेत. विद्यमान कार्यकाळात हा कायदा लागू होऊ शकत नसला तरी भाजपाकडून राजकीयदृष्ट्या हा मुद्दा तापवत ठेवला जाऊ शकतो, अशी माहिती पक्ष आणि केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली.

“संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले

संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे आमचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. नियमात असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.बावनकुळे नागपूरला प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, भिडे हे भाजपाच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्ते नाही. त्यामुळे भाजपाशी त्यांचा जो संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा गांधींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मात्र, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यावरही राजकारण करत आहेत. विरोधकांचे कामच राजकारण करण्याचे, पण सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. यशोमती ठाकूर यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने त्या भाजपावर आरोप करत आहेत. त्यांना धमकी येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपाशी जोडणे हे योग्य नाही.

पाकिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यामागे ISIS चा हात?

अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात काल (३० जुलै) आत्मघातकी हल्ला झाला. एका कट्टरवादी इस्लामी राजकीय पक्षाच्या सभेत एका आत्मघातकी हल्लेखोराने रविवारी घडवून आणलेल्या शक्तिशाली स्फोटात किमान ४४ जण ठार, तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, हा हल्ला आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने घडवून आणल्याचं प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.बजाऊर आदिवासी जिल्ह्याची राजधानी असलेल्या खार येथे जमियत उलेमा-इ-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात दुपारी ४ वाजता हा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका येऊन पोहचल्यानंतर, घाबरलेले लोक स्फोटस्थळी गोळा होत असल्याचे दूरचित्रवाहिनीवरील दृश्यांत दिसून आले. स्फोट झाला, त्यावेळी पाचशेहून अधिक लोक संमेलनात सहभागी झाले होते.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार धोक्यात?

बांगलादेशची राजधानी ढाका येथे २८ जुलै २०२३ रोजी शुक्रवारी विरोधी पक्षाच्या हजारो समर्थकांनी निषेध मोर्चा काढला आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देण्याची तसेच पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी तटस्थ काळजीवाहू प्रशासनाची मागणी केली.बांगलादेशमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) नेते आणि कार्यकर्ते विद्यमान सरकारच्या निषेधासाठी ढाक्याच्या नया पलटण या ठिकाणी जमले होते, किंबहुना या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग होऊ नये म्हणून सुमारे आठ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. त्याच वेळी विरोधी पक्षाच्या निदर्शनाच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर (०.६२ मैल) अंतरावर, सत्ताधारी अवामी लीग (एएल) पक्षाच्या समर्थकांनी “शांतता मोर्चा”चे आयोजन केले होते. बांगलादेशातील घडामोडींनी सध्या वेग घेतला असून तिथे सत्तापरिवर्तनाचे वारे वाहत असल्याची चर्चा सुरू आहे.

डोळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला?

डोळे येऊ नये म्हणून आपली आजी अनेक उपाय करत होती. मात्र, आपण ते विसरत चाललो आहोत. डोळे येण्याची साथ आता सर्वत्र सुरू आहे. डोळे आले नसतील तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक गोष्ट करता येऊ शकते.आयुर्वेदिक डॉक्टर विराज गीते यांनी सांगितले की, एका वाटीमध्ये कापूर घ्यायचे आहे. त्यासोबत लसन लागणार आहे. लसनाच्या बाहेरचे साल काढून घ्यायचे आहे. हे लसनाचे साल आणि कापूर पेटवायचा आहे. यापासून धूर निघणार आहे. हा धूर डोळ्यामध्ये गेल्याने आराम होतो. याशिवाय लहान मुलांचे डोळे आल्यास गाजर आणि पालक याचा रसही देता येऊ शकतो. पालकचा रस मुलांना देता येईल. तसेच गाजरचा रसही घेता येईल. यामुळे डोळे आल्यास आराम वाटेल.

आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्‍याची धमकी

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान या संघटनेचे संस्‍थापक संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्‍मा गांधी यांच्‍याविषयी केलेल्‍या अवमानजनक वक्‍तव्‍याच्‍या विरोधात कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्‍या अटकेची मागणी केली आहे. दरम्‍यान समाजमाध्‍यमावरून एका व्‍यक्‍तीने यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्‍याची धमकी दिली आहे.

नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये महत्त्व अबाधित

पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करीत दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे जाहीर करणाऱ्या पंकजा मुंडे यांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत सचिवपदी कायम ठेवण्यात आल्याने पक्षात त्यांचे महत्त्व अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात राज्यातील तावडे, मुंडे व रहाटकर यांचे स्थान कायम राहिले आहे.पंकजा मुंडे या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व काही प्रदेश नेत्यांबरोबर त्यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे नाराज मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दोन महिने सुटीवर जाणार असल्याचे जाहीर केले होते. राजकीय वाटचालीबाबत विचार व चिंतन करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचे वर्तन अनेकदा भाजपच्या पक्षशिस्तीत बसणारे नसले तरी त्या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या असून मराठवाड्यात त्यांचा प्रभाव आहे. वंजारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारे अनेक नेते व कार्यकर्ते राज्यात असल्याने आणि पंकजा यांचाही प्रभाव असल्याने त्यांना दुखावणे भाजपला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता परवडणार नाही.

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधे गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक

जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी अंधाधुंद गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या RPF कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या घटनेत RPF च्या ASI सह चार जणांचा मृत्यू झाला.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून RPF ASI टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार ज्या RPF जवानाने केला त्याचं नाव चेतन असून त्याला अटक करण्यात आली आहे. गोळीबार केल्यानंतर त्याने उडी मारली. मात्र त्याला मीरा रोड ते बोरीवलीच्या दरम्यान अटक करण्यात आली. त्याची बंदुकही जप्त करण्यात आली.

योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल

विरोधकांच्या आघाडीला इंडिया हे नाव दिल्यापासून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका सुरू आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. योगी आदित्यनाथ म्हणाले, त्यांना इंडिया नाही बोललं पाहिजे. ते नाव I.N.D.I.A. असं आहे. प्रत्येक अक्षरानंतर डॉट्स आहेत.

ISROच्या प्रक्षेपकाचे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर?

काही महिन्यांपूर्वी चीनने उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे अवशेष जमिनीवर पडल्याने चीनचे उपग्रह प्रक्षेपण वादात सापडले होते. असं गेल्या काही वर्षात किमान तीन वेळा घडून आलं आहे. २०२२ मध्ये एप्रिल महिन्या विदर्भातील काही भागात रात्री आकाशातून काही वस्तू जळत जमिनीवर पडल्याचं हजारो नागरीकांनी पाहिलं होतं, काही दिवसानंतर ते चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचं स्पष्ट झालं होतं.असं असतांना आता यावेळी चर्चेत रहाण्याची वेळ भारतावर- इस्रोवर आलेली आहे. इस्रोने काल रविवारी म्हणजेच ३० जुलैला PSLV या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरचे उपग्रह प्रक्षेपित केले होते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील श्रीहरीकोटवरुन आग्नेय दिशेला हे प्रक्षेपण झाले होते. इस्रोच्या प्रक्षेपकाचे – रॉकेटचे विविध टप्पे हे ज्वलन प्रक्रिया झाल्यावर वेगळे होतात आणि अवकाशातून जमिनीच्या दिशेने येतांना वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र यापैकी एक वस्तू ही ऑस्ट्रेलियातील Jurien Bay या किनाऱ्यावर आढळून आली आहे.

जिंकूनही हरला निकोलस पूरन!

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी टीम एमआय न्यूयॉर्कने अमेरिकेत सुरू झालेल्या नवीन टी२० लीग ‘मेजर लीग क्रिकेट’च्या पहिल्या सत्रात विजय मिळवला आहे. त्यांनी अंतिम फेरीत सिएटल ऑर्कास संघाचा २४ चेंडू राखून सात विकेट्सने पराभव केला. एमआय न्यूयॉर्ककडून या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने तुफानी खेळी केली. त्याने अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावले. पूरणने ५५ चेंडूत १३७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि १३ षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २४९.०९ होता.निकोलस पूरन हा मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३८८ धावा केल्या. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा (नाबाद १३७) विक्रमही पूरनच्या नावावर आहे. एमआय न्यूयॉर्कचा ट्रेंट बोल्ट सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर २२ विकेट्स आहेत. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडमच्या सौरभ नेत्रावलकरने सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने नऊ धावांत सहा विकेट्स घेतल्या.

सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. शेड्यूलनुसार, दोघांमध्ये १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार होता, मात्र नवरात्रीमुळे त्यात बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता हा सामना १४ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तारखेतील बदलाबाबत अलीकडेच सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. स्टेडियमची क्षमता एक लाख असून नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम होतात. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय आणि आयसीसी लवकरच नवीन तारखेची घोषणा करू शकतात.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची १०० कोटींकडे घोडदौड

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ या चित्रपटाचा बोलबोला अजूनही सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला असूनही बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड सुरू आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाचा जलवा कायम आहे.नुकतीच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून या चित्रपटाने ३० दिवसांत किती कोटींची कमाई केली, हे जाहीर केलं आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने ३० दिवसांत ७०.२० कोटींची कमाई केली आहे. याचा फोटो केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या कमाईबरोबर एक जबरदस्त असं वाक्य लिहिलं आहे. “हॉलिवूड-बॉलिवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा ‘भारी’ आकडा” असं हे वाक्य आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.