पाकिस्तानातील पुराणमतवादी अशा वायव्य प्रांतातील एका महिला विद्यापीठाने विद्यार्थिनींना शैक्षणिक परिसरात स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे.
महिला विद्यापीठ स्वाबी हे खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात आहे. तालिबानी दहशतवादी या भागात सक्रिय असून ते अधुनमधून मुलींच्या शाळांना लक्ष्य करत असतात.
२० एप्रिलपासून महिला विद्यापीठ स्वाबीच्या परिसरात स्मार्टफोन/ टचस्क्रीन मोबाइल किंवा टॅबलेट वापरण्याची मुभा राहणार नाही,’ अशी अधिसूचना विद्यापीठाच्या प्रमुखांनी जारी केल्याचे वृत्त समा टीव्हीने दिले.
‘विद्यापीठ असतानाच्या वेळेत विद्यार्थी समाजमाध्यम अॅप्सचा अतोनात वापर करतात असे आढळून आले आहे. यामुळे त्यांचे शिक्षण, वर्तणूक व कामगिरी यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, विद्यापीठाच्या वेळेत विद्यार्थ्यांनी मोबाइल फोन वावरू नये असे निर्देश देण्यात येत आहेत,’ असे अधिसूचनेत नमूद केले आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील विद्यापीठे विद्यार्थिनींवर नेहमीच ड्रेस कोड व केशरचनेसह अनेक कठोर निर्बंध लागू करतात. त्यांनी विद्यार्थिनींना सलवार कमीज हा पोशाख बंधनकारक केला आहे.