श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर होणाऱ्या सरकारविरोधी निदर्शनांचे रात्रभर चालणाऱ्या पहाऱ्यात रूपांतर झाले आहे. देश अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला असताना, १० हजारांहून अधिक निदर्शक गॅले फेस ग्रीन अर्बन पार्कवर गोळा झाले होते.
१९४८ साली ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. दीर्घकाळ चालणारी वीजकपात, तसेच इंधन, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा याविरुद्ध लोक गेले अनेक आठवडे निदर्शने करत आहेत.
शनिवारी दुपारपासून समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी राजपक्षे यांचे सचिवालय असलेल्या गॅले फेसकडे कूच केले. सायंकाळपर्यंत मुख्य गॅले मार्ग निदर्शकांमुळे अवरुद्ध झाला आणि तेथील वाहतूक ठप्प झाली.
‘आम्ही अजूनही येथे आहोत’, असे घटनास्थळावरील एका निदर्शकाने रविवारी सायंकाळी ६ वाजता त्याच्या समाजमाध्यमावरील पोस्टवर लिहिले. या भागातील मोबाइल फोन्सचे संकेत जॅम करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. निदर्शकांचा एक गट तेथे रात्रभर पहारा देत थांबला होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ‘गो होम, गोता’, अशा घोषणा देत ते अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
श्रीलंकेतील आर्थिक संकटावर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी ४२ अपक्ष खासदारांचा समावेश असलेल्या अकरा पक्षांच्या आघाडीला आमंत्रित केले असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले आहे.