आज दि.२८ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राही सरनोबतने सुवर्णपदक
जिंकून रचला इतिहास

क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाज आणि मराठमोळ्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीत राहीने ४० पैकी ३९ गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.

मुख्यमंत्र्यांनी दिला गर्दी
करणाऱ्यांना धोक्याचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.

५० हजार कोटींच्या
पॅकेजची घोषणा

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

सेरेना विल्यम्स ऑलिम्पिकमध्ये
सहभागी होणार नाही

अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही. सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली असून तिने ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके पटकावली आहेत.

ट्विटरच्या संकेतस्थळावरील
भारताच्या नकाशावर छेडछाड

पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर वादात सापडली आहे. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात आधीच तणावाचे वातावरण आहे आणि आता ट्विटरची अडचणीत आणखी वाढू होऊ शकते. ट्विटरच्या संकेतस्थळावरील भारताच्या नकाशावर छेडछाड केली गेली आहे. ट्विटरने आपल्या वेबसाइटवर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र देश म्हणून दाखवले आहे.

फडणवीसांनीच ओबीसींचं
आरक्षण काढलं : नाना पटोले

ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्याची मशिन आहे. खोटं बोला रेटून बोला. धनगर समाजाचा प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असो. पाच वर्षे त्यांनी खोटेपणा केला. नौटंकी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला कळलेला आहे. चार महिन्यात मी आरक्षण मिळवून देतो, असं म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं आहे. त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही.”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते
११ महिलांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुचाल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री विशाखा सुभेदारने फेसबुकवर याविषयी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२० वर्ल्डकप संयुक्त अरब
अमिरातीमध्ये हलवत आहोत : शाह

भारतातील क्रिकेट चाहत्यांना नाराज करणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याबाबत अंतिम घोषणा केली. ते म्हणाले, ”आम्ही भारतात होणाऱ्या २०२१ टी-२० वर्ल्डकपला संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवत आहोत. या संदर्भात आज आम्ही आयसीसीला माहिती देणार आहोत. टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल.”

लाल किल्ला हल्लाप्रकरणी
२१ वर्षीय शेतकऱ्याला अटक

प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत हिंसाचार भडकला होता. काही शेतकरी लाल किल्ल्यावर पोहचले होते त्यामुळे गोंधळ उडाला होता. दरम्यान या प्रकरणी एक लाख रुपये बक्षिस असलेल्या २१ वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरजोत सिंग, असे त्याचे नाव आहे. याला सोमवारी सकाळी अमृतसर येथून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली.

सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल
शंका नाही : शरद पवार

महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही” असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आम्हा सर्व पक्षांमध्ये सामंजस्य आहे, यात कुठलेही मतभेद नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले, असं शरद पवारांनी सांगितलं.

पुलवामामध्ये पोलिस अधिकाऱ्याची
घरात घुसून त्यांची हत्या

जम्मूमधील ड्रोन हल्ल्याला 24 तास देखील झाले नसताना दहशतवाद्यांनी पुलवामामधील माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या (SPO) घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. पुलवामा येथील हरिपरीग्राम गावात स्थित माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात फैयाज अहमद यांचा जागीचं मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.