करोना महासाथीच्या तिसऱ्या लाटेनंतर भारताची कोविड-१९ साठी प्रभावी पुनरुत्पादन संख्या (आर-व्हॅल्यू) जानेवारीनंतर प्रथमच १ पेक्षा जास्त झाली आहे. लोकसंख्येत करोनाचा फैलाव किती झपाटय़ाने होत आहे, याची ‘आर-व्हॅल्यू’ ही निदर्शक आहे.
गेल्या काही आठवडय़ांत स्थिर वाढ झालेली आर-व्हॅल्यू १२ ते १८ एप्रिल या कालावधीत १.०७ होती, असे चेन्नईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील संशोधक सिताभ्रा सिन्हा यांनी सांगितले. यापूर्वीच्या आठवडय़ात ती ०.९३ इतकी होती.
करोनाचा संसर्ग झालेली प्रत्येक व्यक्ती हा संसर्ग सरासरी किमान एका व्यक्तीपर्यंत पसरवत आहे, असे दर्शवणारी आर-व्हॅल्यू १ हा ‘उंबरठा’ असून यानंतर संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. सिन्हा म्हणाले, ‘ही लाट असेल का हे आताच सांगता येणार नाही. गेल्या ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये आर-व्हॅल्यू १ पेक्षा अधिक होती, परंतु तिला लाट म्हणता आले नाही. १ पेक्षा अधिकची आर-व्हॅल्यू म्हणजे लाट आहे असे म्हणता येत नाही, मात्र १० दिवसांत संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत.’
नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी, गर्दी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.