वसईतील नेते विजय पाटील यांचा शिवसेनेला रामराम

महाविकास आघाडीतील नेत्याने एका पक्षातून दुसऱ्यात उडी मारण्याचं उदाहरण पुन्हा समोर आलं आहे. वसईतील नेते विजय पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विजय पाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित विजय पाटलांनी काल पक्ष प्रवेश केला. विजय पाटील यांची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2019 मध्ये पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधले होते.

विजय पाटील वसई विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यानुसार शिवसेनेच्या तिकीटावर वसईतून त्यांनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात शड्डूही ठोकला. मात्र त्यांना ठाकूर यांनी सहज पराभवाची धूळ चारली होती.

विजय पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते आहेत. आग्री, वाढवळ, ख्रिश्चन समुदायांचा त्यांच्या पाठीशी चांगला जनाधार असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.

विजय पाटील यांच्या घरवापसीने वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे, तर काँग्रेसला बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्र सामोरे जाणार की स्वतंत्र, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. परंतु वसईत प्राबल्य असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे विजय पाटील यांना मोठं पाठबळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.