आज दि.४ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….


तुम्ही आंधळेपणाचं नाटक करु शकता,
लोकांना मरताना पाहू शकत नाही : न्यायालय

देशामध्ये करोनामुळे आरोग्य व्यवस्थांची कमतरता जाणवत आहे. आजच देशातील करोना रुग्णसंख्येने २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या २ लाखांच्या पुढे गेलीय. जगातील सर्वाधिक करोना मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे. असं असतानाच देशातील करोना परिस्थिती दिवसोंदिवस आणखीन चिंताजन होताना दिसत आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही मंगळवारी ऑक्सिजनच्या कमतरतेसंदर्भात केंद्र सरकारला ढिसाळ कारभारासाठी फटकारले. “देशात करोनासंदर्भातील जी परिस्थिती निर्माण झालीय त्याबद्दल तुम्ही आंधळेपणाचं नाटक करु शकता आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच “केंद्र सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली असून आम्ही असं करु शकत नाही”, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने ऑक्सिजन व्यवस्थापनासंदर्भातील संताप व्यक्त केला.

कडकडीत लॉकडाउन
हाच एकमेव पर्याय

करोना विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा भीती दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन उपयोगी नसून, विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाउन लागु करण्याची आवश्यकता आहे, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.

दुसऱ्या लाटेचे थैमान
‘आयपीएल’ स्पर्धा स्थगित

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान, चेन्नईच्या संघातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ‘आयपीएल’ स्पर्धा स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

बीसीसीआयचं २००० कोटी रुपयांच
नुकसान होण्याची शक्यता

आयपीएलच्या स्पर्धा स्थगित झाल्याने बीसीसीआयचं २००० कोटी रुपयांच नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे सामने देखील रद्द होण्याची शक्यता आहे. जर भारताकडून या स्पर्धेचे यजमानपद काढल्यावर बीसीआयचे यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या स्पर्धांचे आयोजन हे गेल्या वर्षी प्रमाणे युएईमध्ये करण्यात यावं असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचं म्हणणं होतं. जर आयपीएलचे सामने परदेशात खेळवले असते तर ही स्पर्धा स्थगित झाली नसती.

जेईई मेन चौथ्य़ा टप्प्याची
परीक्षा पुढे ढकलली

जेईई मेनची चौथ्य़ा टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधली परीक्षा पार पडली होती. तिसऱ्या टप्प्यातली परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती आणि आता चौथ्या टप्प्यातली परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे.

करोना मृत्यूंच्या यादीत
जगात भारत तिसऱ्या स्थानावर

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दररोज लाखोंच्या संख्येनं करोनाबाधित आढळून येत असून, गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही चिंता वाटावी इतकं वाढलं आहे. दररोज साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांवर करोना, ऑक्सिजनअभावी वा बेड न मिळाल्याने मृत्यू ओढवत आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे. भारतातील एकूण करोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

सरकारकडे रणनीती नसल्याने
आता लॉकडाउन हाच पर्याय

देशातली सध्याची परिस्थिती पाहता देशात आता संपूर्ण लॉकडाउन लागू करणं हा एकमेव पर्याय असल्याचं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच केलं होतं. मात्र, आता त्यांनी एक नवं ट्विट करुन आपण असं का म्हणालो याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल म्हणतात, मला फक्त हे सांगायचं आहे की, “भारत सरकारकडे कसलीही रणनीती नसल्याने आता लॉकडाउन हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी विषाणूला रोखण्याऐवजी या टप्प्यावर पोहोचण्यास सक्रियपणे मदत केली. हा एक गुन्हाच आहे”.

परमबीर सिंग यांच्यावर
पैसे उकळल्याचा आरोप

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरच आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.

सतेज पाटील यांच्या गटाचे
तीन उमेदवार विजयी

कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्या चुरस बघायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये सतेज पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

माजी राज्यपाल जगमोहन
यांचे दिल्लीत निधन

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी 1984-89 आणि जानेवारी-मे 1990 अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते.

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री
हीच्या निधनाची अफवा

कोरोना महामारीमुळे सध्या बॉलिवूड सेलेब्सच्या निधनाच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्या आवडत्या सेलेब्सविषयी अशा बातम्या वाचल्यानंतर चाहते देखील अस्वस्थ होतात आणि सोशल मीडियावर त्या सेलेब्सबद्दल चर्चा करू लागतात. आता या यादीमध्ये आणखी एक अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. वास्तविक ती चित्रपटांच्या जगातून गायब झाल्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुणे विद्यापीठातील सहा
कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसला आहे. आतापर्यंत विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. या विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या होत्या.


SD social media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.