महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरू असलेला वाद कमी होण्यासाठी महत्त्वाचा तोडगा काढण्यात आला. दोन्ही राज्यांच्या तीन-तीन नेत्यांची समिती स्थापन करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्वीटरबाबत तक्रार नोंदवली, पण बोम्मईंच्या ट्विटरबाबत नवा ट्वीस्ट आला आहे. ते ट्वीटर अकाऊंट आपलं नसल्याचं बोम्मईंनी बैठकीत सांगितल्याचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच अशा फेक ट्वीटर अकाऊंटवर एफआयआर दाखल करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
‘अमित शाह यांचे धन्यवाद आणि आभार मानतो. मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसावर अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी आणि कर्नाटक मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केलं. दोन्ही राज्यांमध्ये शांततेचं वातावरण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्या. तीन-तीन मंत्र्यांची समिती गठीत होईल, मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसांचे कार्यक्रम यांच्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका मांडली’, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
‘सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे, त्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. काही ट्वीट आणि त्यांच्या वक्तव्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी हे ट्वीटर हॅण्डल आपलं नाही, तसंच असं वक्तव्य आपण केलं नाही, असं ते म्हणाले’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
‘आगीत तेल ओतण्याचं काम कुणीतरी करत आहे, त्यामुळे मराठी माणसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. पक्षीय राजकारण न करता मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे’, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.