एकीकडे देशभरात कोरोना विषाणूने उच्छाद मांडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकमध्येही हीच परिस्थिती असून जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी नाशिक पालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाला अटकाव घालताना नाशिकमध्ये नव्या रोगांनी डोकं वर काढलं आहे. चिकनगुनिया आणि डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढू लागले असल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाढणाऱ्या रोगांचे रुग्णही वाढू लागले आहेत. नाशिकमध्येही पावसाने जोर धरल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे शहरात चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. शहरात चिकनगुनियाचे 31 तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात चिकणगुनियाचा सर्वाधिक प्रसार हा सातपूर भागात झाला आहे.
शहरात चिकनगुनिया आणि डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी नाशिक आरोग्य विभागाकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभाग शहरात ठिकठिकाणी फवारणी करत असून तपासणीचे कामही सुरु आहे. नागरिकांमध्ये या रोगांबाबत जनजागृती करुन स्वच्छतेचे आवाहन ही आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. नाशिक पालिकेचे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभाग चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने सर्व शक्य प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांनी ही या आजाराबाबत तितक्याच गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे. घरात किंवा आसपासच्या परिसरात एखाद्या ठिकाणी पाणी जास्त वेळ साचवून न ठेवणे, स्वच्छता ठेवणे, प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आहार करणे अशा प्रकराची काळजी घेणे महत्वाचे आहे.
डेंग्यू हा शुद्ध पाण्यातील एडीस डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला ताप येणे, अंग दुखी इत्यादी लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर ताप कमी झाल्यानंतर लालसरपणा येणं, हाता पायाला खाज सुटणे, पित्ताशय सूज येऊन धाप लागणे इत्यादी त्रास जाणवू लागतात. तसेच, यामुळे रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी ही कमी होतात. त्यामुळे डेंग्यूची लक्षणं दिसताच तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. त्यामुळे येत्या काळात अजून साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. राज्याभोवती डेंग्यूचा विळखा वाढण्याची शक्यता आहे.