राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीला रामराम!

गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिसत होते. त्याची घोषणा अखेर आज कोल्हापुरात झाली आहे. महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.

मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो आणि मविआचे आणि आमचे संबंध सगळे संपलेले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्याला ही सगळी परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं, मुंबईवाल्यांनी फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय. आता या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊयात, असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले आहे. आता राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे.

हा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय झाला आहे, काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही, याचा फैसला 5 एप्रिलच्या कार्यकारीणीच्या बैठकीत करु असे म्हणत बाहेर पडण्याचे संकेत दिले होते.

राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार होते, मात्र राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने त्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले होते. तेव्हापासून शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष वाढला होता. महाविकास आघाडीने दिलेले वचन पाळले नाही, असा थेट आरोप राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज यापुढे स्वाभिमानीची एकला चलो रेची भूमिका जाहीर झाली आहे.

आता रोज ईडीच्या चौकशी बद्दल ऐकतोय, माझं ईडीच्या प्रमुखांना सांगणं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना हजारो कोटींचा चुना लावत आहेत. त्याचे पुरावे आणि तक्रारी मी केली आहे. मग याचा तपास का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांना 22 हजार कोटींची नफा कसा झाला? याचा तपास सीबीआय का करत नाही. त्यामुळे देशभरात शेतकऱ्यांचा नवा एल्गार पाहायला मिळेल. आम्ही कधी एनडीएच्या मागे लागलो नाही आणि महाविकास आघाडीच्याही मागे लागलो नाही. एनडीएसोबत यावं यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विनंती केली आणि महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.