टी 20 वर्ल्ड कपमध्ये बुधवारी भारत आणि बांगलादेश संघात ग्रुप 2 मधील महत्वाचा सामना होणार आहे. पॉईंट टेबलमध्ये दोन्ही संघांच्या खात्यात 4-4 पॉईंट जमा आहेत. पण सध्याची टीम इंडियाची कामगिरी पाहता बांगलादेशसमोर भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. हा सामना अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. याआधी मेलबर्न, सिडनी आणि पर्थमध्ये वेगवेगळ्या वेळेत टीम इंडियाचे सामने खेळवण्यात आले होते. पुन्हा एकदा भारतीय संघाच्या सामन्याच्या वेळेत बदल झाला आहे. मेलबर्नमध्ये दुपारी 1.30, सिडनीत 12.30 त्यानंतर पर्थमध्ये 4.30 अशा वेगवेगळ्या वेळेत भारताचे सामने खेळवण्यात आले होते.
अॅडलेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मंगळवारीही सकाळपासूनच वातावरण बिघडलेलं असून पाऊस आणि थंडी आहे. बुधवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आता चिंतेची बाब ही की बुधवारीही पाऊस असाच सुरू राहिला तर सेमी फायनल गाठण्याचं भारताचं समीकरण थोडं बिघडू शकतं.
हवामान खात्याच्या माहितीनुसार बुधवारी सकाळपासूनच अॅडलेडमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी अॅडलेडमध्ये तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र ज्यावेळी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे त्या वेळी पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो. पावसामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता जास्त आहे.
बांगलादेशविरुद्ध कुणाला संधी, कोण आऊट?
बांगलादेशविरुद्ध प्लेईंग इलेव्हन निवडताना रोहितची डोकेदुखी वाढणार आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सलामीवीर लोकेश राहुलचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यानं तीन डावात मिळून केवळ 22 धावा केल्या आहेत. पण त्याची आधीची कामगिरी लक्षात घेता रोहित शर्मा राहुलला आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे. विकेट किपर दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. तर गेल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या दीपक हुडाच्या जागी युजवेंद्र चहल किंवा अक्षर पटेलला संघात जागा मिळू शकते.