महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा पुढचा अंक आता सुप्रीम कोर्टात लढला जाणार आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आलेले 39 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायदा लागू होण्यापासून वाचायचं असेल तर शिंदे गटाला दोन-तृतियांश आमदारांची गरज आहे. विधानसभेमध्ये शिवसेनेचे 55 आमदार आहेत, म्हणजेच दोन-तृतियांश आमदारांसाठी त्यांना 37 आमदारांची गरज आहे, त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे 2 आमदार जास्त आहेत.
पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांना त्यांच्या या गटाचं एका पक्षात विलिनिकरण करावं लागेल, पण दोन-तृतियांश आमदारांचं गट ठेवून विलिनिकरण न करता शिंदे गट विधिमंडळात बसू शकतो, असंही काही घटनातज्ज्ञांचं मत आहे.
शिंदे गटाकडे दोन-तृतियांश आमदार असतील तर त्यांना भाजप किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण यात नवा ट्विस्ट समोर आला आहे. शिंदे गटाला विलीन व्हावं लागलं, तर त्यांच्याकडे मनसेचा पर्याय असू शकतो का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या मनसेकडे सध्या राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत.
एकीकडे या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याचीही माहिती आता समोर येत आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं वृत्त आहे.
शिंदे गट मनसेमध्ये विलीन व्हायची शक्यता का?
– गुवाहाटीमध्ये असलेला शिंदे गट हा वारंवार शिवसेनेवर हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा आरोप करत आहे. हिंदुत्वासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडा, असं शिंदे यांचा गट शिवसेनेला वारंवार सांगत आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचाच मुद्दा उपस्थित केल्यामुळे शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन व्हायचा मार्ग सोयीस्कर आहे.
– तसंच ठाकरे हे आडनावही शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन होण्यासाठी पूरक ठरू शकतं. राज ठाकरे यांचं भाषण आणि त्यांची वक्तृत्वशैली बाळासाहेब ठाकरेंशी जुळणारी आहे, तसंच राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असल्याच्या भावनाही कार्यकर्ते आणि नेतेही बरेच वेळा बोलून दाखवतात.
एकनाथ शिंदे यांनी आपल्यामागे महाशक्ती उभी असल्याचं वक्तव्य गुवाहाटीमध्ये आमदारांशी बोलताना केलं. भाजप अजूनपर्यंत या बंडापासून लांब असल्याचं दाखवत असली तरी त्यांचे नेते या आमदारांसोबत दिसले आहेत. राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांमधली भूमिका हीदेखील भाजपच्या विचारांच्या जवळ जाणारी आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्येही मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपला मदत केली होती.
– एकनाथ शिंदे यांचा गट जर मनसेमध्ये विलीन होत असेल तर राज ठाकरे यांनाही पक्ष राज्याच्या ग्रामिण भागात वाढवण्याची संधी मिळेल. तसंच मनसेलाही नवी उभारी मिळायलाही मदत होईल.