दोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल

करोनाची लाट आणि मानेच्या आजारामुळे गेली दोन वर्षे निवासस्थानातून राज्यकारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात येऊन प्रत्यक्ष कामकाज केले. विविध विभागांत प्रत्यक्ष जाऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर, महत्त्वाकांक्षी तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना देतानाच पेपरविरहित कामकाज आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून कारभार गतिमान करण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या.

कोरनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षां’ निवासस्थान किंवा सह्याद्री अतिथीगृहातून कामाकाजास प्राधान्य दिले होते. अपवाद फक्त रायगडमधील तळीये गावावर कोसळलेल्या संकटाच्यावेळी गेल्या वर्षी २३ जुलै रोजी मुख्यमंत्री काही काळासाठी मंत्रालयात आले होते.

मुख्यमंत्र्यांचा ताफा मंत्रालयात येताच त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. तसेच पुराभिलेख संचालनालयातर्फे त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रदर्शनाची पाहणी केली. प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रे, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी करीत हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी पण लावा अशी सूचना ठाकरे यांनी केली. सहाव्या मजल्यावरील दालनातून प्रत्यक्ष कामकाज केले.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील विविध विभागात जाऊन तेथील कामकाजाची पाहणी केली तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ठाकरे सामाजिक न्याय, महसूल, सामान्य प्रशासन, गृह, विधि व न्याय आदी विभागात फिरले. तसेच संकल्प कक्ष आणि मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षातील कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सूचनांमुळे उत्साह दुणावल्याची तसेच आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत, त्यांच्या भेटीने आम्हाचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन- ८ मार्च रोजी आम्हा सर्वाना आपुलकीने पत्र आणि फूल देऊन आश्चर्यचकित केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकित करणारी असल्याच्या प्रतिक्रिय़ा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षांनी मंत्रालयात आल्याने आता हत्तीवरून साखर वाटा, गुढय़ा-तोरणे उभारा, मंत्रालयात रांगोळय़ा घाला, अशी खोचक टीका मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.