अल्पवयीन कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट
दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट आणि चार्जशीट दाखल केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली. पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीसंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही त्यामुळे POCSO अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत असं दिल्ली पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे. Live Law ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
मार्केटमध्ये आली चिकन मटन पाणीपुरी; मेन्युचा PHOTO तुफान व्हायरल
जवळपास सर्वांनाच बाहेरचं खायला खूप आवडतं. खास करुन पाणीपुरी ही अनेकांची आवडती असते. लोक कधीही कुठेही पाणीपुरी खाऊ शकतात. बाकी फूड प्रकारांसारखंच पाणीपुरीमध्येही आता अनेक नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. लोक आनंदाने पाणीपुरी खाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालतात. नुकताच मार्केटमध्ये पाणीपुरीचा नवा प्रकार आला आहे. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे.तुम्ही आत्तापर्यंत पाणीपुरीचे अनेक प्रकार खाल्ले असतील. मात्र तुम्ही कधी नॉनव्हेज पाणीपुरी खाल्लीय का? कदाचित तुम्ही हे ऐकलंही पहिल्यांदाच असेल. सोशल मीडियावर सध्या पाणीपुरीच्या या मेन्युचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे.
शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास
राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अशात आज शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र रेल्वेतून प्रवास केला आहे. या दोघांच्या एकत्रित प्रवासाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासात दोघांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दोन नेत्यांच्या प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेसने केला रद्द; सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला
कर्नाटकमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर काँग्रेस सरकारने भाजपाच्या काळात झालेल्या निर्णयांना बदलण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे भाजपाने मंजूर केलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेस सरकारने रद्द ठरविला आहे. काही दिवसांपूर्वी अभ्यासक्रम बदलण्याबाबत समिती स्थापन केल्यानंतर आता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सत्ता आल्यानंतर गरज भासल्यास भाजपाने तयार केलेले कायदे बदलणार, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मंत्रिमंडळाने इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याला परवानगी दिली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीबाबतचाही कायदा बदलण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे विधी आणि संसदीय कार्यमंत्री एचके पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
पाकिस्तानशी तणाव बाजूला सारून भारत मदतीसाठी सरसावला
बिपरजॉय चक्रीवादळ अवघ्या काही तासांत गुजरातच्या कच्छ भागातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र, चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा प्रभाव किती काळ आणि किती क्षेत्रावर राहील, यासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवतानाच भारतानं या नैसर्गिक संकटकाळात तणाव बाजूला सारून पाकिस्तानलाही शक्य ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली आहे.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोस्तीत मिठाचा खडा…” जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोस्तीत मिठाचा खडा टाकण्याची इच्छा आमची कुणाचीही नाही. त्यांची मैत्री कायम रहावी हेच आपला धर्म आपल्याला शिकवतो. पण आता मीठाचा खडा कुणी टाकला? अंतर्गतच झालं आहे. मुख्य पानाचं प्लॅनिंग तीन ते चार दिवस आधी ठरतं. दोन ते चार कोटी रुपये खर्च एका वृत्तपत्राचा असतो. ते जाऊद्या पण राष्ट्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात शिंदे ही जाहिरातीची संकल्पना कुणाची ते समजलं पाहिजे असं आता जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी, पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.जवळपास एक आठवड्यांपूर्वी ही चोरी झाल्याची बातमी समोर आली असून पोलिसांनी त्या चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी त्या चोरांकडून शिल्पाच्या घरातून चोरी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शिल्पानं जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आशिया कप स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून होणार सुरुवात
आशिया कप २०२३ या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील १३ सामने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ संघांत होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.आशिया चषक स्पर्धेबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. ही स्पर्धा आता दोन देशांमध्ये आयोजित केले जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाच्या या हंगामात दोन गट असतील. यावेळी आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तामध्ये जाण्यास नकार दिला. या कारणासाठी, हायब्रीड मॉडेल निवडले आहे.
SD Social Media
9850 60 3590