मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! पोलिसांच्या शस्त्रागारावर जमावाचा हल्ला
मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार घडत आहेत. आतापर्यंत जवळपास १२० लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर शेकडो घरं आगीच्या भक्ष्यस्थानी केली आहेत. ३ मे रोजी मेइती समुदायाने काढलेल्या रॅलीनंतर मणिपूरमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मणिपूरमधील जातीय हिंसाचार अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये.शुक्रवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि संघर्षग्रस्त मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी पहाटेपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे पोलीस आणि लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. आज (शनिवार) लांगोल येथे काही समाजकंठकांनी एका रिकाम्या घराला आग लावली.
आळंदी, देहूवरून निघालेल्या वारकऱ्यांसाठी अपुरी शौचालये, प्रकरण उच्च न्यायालयात
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीमधून तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीबरोबर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून या वारीसाठी वारकरी येत असतात. निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहाचा विषय मार्गी लावला जातो. यावर्षी ब्लॅक लिस्ट कंपनीला ठेका दिल्याने इतर ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रत्येक्षात ५ हजार ५०० मोबाईल शौचालयांची गरज असताना केवळ दोन ते अडीच हजार शौचालये संबंधित कंपनीने दिल्याने ठेकेदारांनी प्रश्न उपस्थित केला असून संपूर्ण प्रक्रियेप्रकरणी रविराज लायगुडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राष्ट्रवादीतील आगामी बंडखोरीबाबत श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अलीकडे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल विधान केलं. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, येत्या काळात शिंदे गटाचे आमदार कदाचित भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असा दावा जयंत पाटलांनी केला.जयंत पाटलांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. स्वत:च्या पक्षाची काळजी करा, येणाऱ्या काळात काहीही घडू शकतं, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
ड्रायव्हिंग लायसन्सवर आता ‘लेझर प्रिंट’; माहिती पुसट होण्याची समस्या निकाली निघणार
राज्यात वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे नवीन ‘स्मार्ट कार्ड’ १ जुलैपासून मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी परिवहन खात्याने कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. नवीन ‘स्मार्ट कार्ड’वर ‘लेझर प्रिंट’ असल्याने जुन्या स्मार्ट कार्डवरील माहिती पुसट वा अस्पष्ट होण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.स्मार्ट कार्ड निर्मितीबाबत हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीसोबत परिवहन विभागाचा करार झाला होता. हा करार नुकताच संपुष्टात आला. त्यामुळे परिवहन खात्याने कर्नाटकातील ‘द एमसीटी कार्ड ॲन्ड टेक्नोलाॅजी प्रा. लि.’ या कंपनीसोबत करार केला. नवीन ‘स्मार्ट कार्ड’ची निर्मिती ‘पाॅली कार्बोनेट’ या महागड्या घटकांपासून होणार आहे. त्यावर रेघोट्याही कमी पडतात. खिशात ठेवल्यावर त्यावरील शाई मिटत नाही.
‘समृद्धी’वर आता नायट्रोजन हवा, पंक्चर दुरुस्ती मोफत
समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी परिवहन खात्याने शिर्डीपाठोपाठ बुधवारी नागपुरातही समृद्धी महामार्गाच्या नागपूर द्वारावर वाहनांसाठी मोफत नायट्रोजन हवा व पंक्चर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध केली आहे. छत्रपती संभाजी नगरलाही ही सुविधा देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.नागपूर-शिर्डी दरम्यान सातत्याने वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. बऱ्याच अपघाताला खराब टायर हे एक कारण आहे. टायरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते ९ जूनला शिर्डीत सीएट कंपनीच्या मदतीने मोफत नायट्रोजन हवा भरणे आणि पंक्चर दुरुस्ती, टायर तपासणीसह इतरही सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.
माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू राजकारणात जाणार?
भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आता राजकारणात नशीब आजमावणार आहे. रायुडू आंध्र प्रदेशातील कृष्णा किंवा गुंटूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. खरे तर रायुडूने राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचे आपले इरादे फार पूर्वीच स्पष्ट केले होते. अंबाती रायडू लवकरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष वायसआर काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतो.
SD Social Media
9850 60 3590