मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मोठा निर्णय
शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. या घडामोडींनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या मनिषा कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली.
फक्त क्रिकेटच नाही, दिल्ली भाजपातही खासदार गौतम गंभीरचे अनेकांशी वाद; पक्षासाठी बनला ‘गंभीर’ प्रश्न
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर एका मुलाखतीमुळे खूप चर्चेत आले. माजी क्रिकेटपटूंनी पान मसाल्याच्या जाहिराती केल्यामुळे गौतम गंभीरने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गौतम गंभीर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासमोरच भाजपाच्या नेत्यांना, खासदारांनाही फैलावर घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिल्ली येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गंभीर यांनी आपल्या नेहमीच्या तापट स्वभावाचे दर्शन घडवून दिले, त्यामुळे पक्षात त्यांच्याबद्दल अस्वस्थता आहे. २०१९ साली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ५५ टक्के मतदान घेऊन गंभीर यांनी विजय मिळवला होता.
पंतप्रधान मन की बात ऐवजी ‘मणिपूर की बात’ कधी करणार? विरोधकांचे सरकारला प्रश्न
मणिपूर हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. मणिपूरमधील विरोधक आणि काँग्रेसने हिंसाचार थांबविण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी ट्वीट करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “खरेतर ‘मन की बात’च्या आधी ‘मणिपूर की बात’ व्हायला हवी. पण सर्वच व्यर्थ आहे. सीमावर्ती राज्य असलेल्या मणिपूरमध्ये अनिश्चितता आणि चिंताजनक वातावरण आहे. असे वाटते की, सरकार मणिपूरला भारताचा भाग मानतच नाही. सरकारला महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल.”
महिला मल्लांमध्ये आता ‘ट्विटर कुस्ती!’ साक्षी मलिकचा ‘तो’ दावा बबिता फोगाटने फेटाळला
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर जो वाद रंगला आहे तो अद्याप शमलेला नाही. अशातच दोन महिला मल्लांमध्ये ट्विटर कुस्ती पाहण्यास मिळते आहे. साक्षी मलिकने तिचा पती सत्यवत कादियानसह एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने बबिता फोगाटचं नाव घेतलं होतं. या आरोपांवर बबीता फोगाटने उत्तर दिलं आहे. कुस्तीगीरांनी काँग्रेसच्या इशाऱ्यावर आंदोलन केल्याचा आरोप बबिता फोगाटने केला. त्यानंतर साक्षीने तिला पुन्हा उत्तर दिलं. आरोप प्रत्यारोपांची ट्विटर कुस्तीच या दोघींमध्ये पाहण्यास मिळाली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारकरांनी मोठ्या जल्लोषात भक्तीमय वातावरणात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे पाच दिवसांसाठी आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.
“…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिलं. ते अकोला येथे बोलत होते.उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१९ साली उद्धव ठाकरे जेव्हा भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन खुर्चीच्या मोहाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तेव्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं की,’मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा’. त्यानंतर मी परत तर आलोच, पण एकनाथ शिंदेंनाही बरोबर घेऊन आलो.”
वाढदिवशीच मोईन अलीवर ICCने केली कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला आयसीसीने आचारसंहिता मोडल्याबद्दल दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोईन अली अडचणीत सापडला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीला आयसीसीने त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे.मोईन अलीला वाढदिवसाच्या दिवशीच आयसीसीने आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मोईन अलीवर आयसीसीची आचारसंहिता २.२० मोडल्याचा आरोप आहे. वास्तविक, हे खेळाच्या भावनेविरुद्ध खेळाडूंच्या वर्तनाला लागू होते. आयसीसी आचारसंहिता लेव्हल-१ अंतर्गत दोषी आढळल्यानंतर मोईन अलीच्या नावावर १ डिमेरिट गुण जोडण्यात आले आहेत. मात्र, गेल्या २४ महिन्यांत मोईन अली पहिल्यांदाच दोषी आढळला आहे.
SD Social Media
9850 60 3590