आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटल याने यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी नेट बॉलर होण्याचा अनुभव उघडपणे सांगितला आहे. २३ वर्षीय खेळाडूने सांगितले की, जर कोणी जखमी झाले तर त्याला खेळण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. अशाप्रकारे त्याची दिशाभूल करण्यात आली होती. स्पर्धेच्या १५ व्या हंगामापूर्वी हा तरुण नेट गोलंदाज म्हणून सुपर किंग्जमध्ये सामील झाला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्याच्याशी केलेले हे वर्तन योग्य नव्हते.
जोश लिटलने क्रिकबझला सांगितले की, “मला सांगण्यात आले होते तसे काहीच नव्हते. मी जाण्यापूर्वी मला सांगण्यात आले होते की, मी नेट बॉलर आहे आणि जर कोणी जखमी झाले तर मला खेळवले जाण्याची शक्यता आहे. पण मला हवे तेव्हा गोलंदाजी करता आली नाही. मला दोन षटके (सराव शिबिरात) मिळायची, ‘दोन षटके टाकण्यासाठी, मी अर्धे जग खेळून इथे आलो आहे!’ कदाचित मी भोळा आणि सरळ होतो. मी लंका प्रीमियर लीग आणि टी-१० मध्ये खेळलो, माझे वर्ष चांगले गेले. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. मला ते बरोबर वाटले नाही.”
आयरिश खेळाडू पुढे म्हणाला, “जेव्हा मला कळले की मी एक नेट बॉलर आहे, ज्याला स्लिंगर्स थकल्यावर गोलंदाजी करण्यासाठी कोणाची तरी गरज असते. तेव्हा ते माझ्यासाठी ‘मला येथून बाहेर काढा’सारखे होते. म्हणूनच कदाचित ते मला परत कधीच घेणार नाहीत. कारण मी दोन आठवड्यांनंतर माघारी परतलो होतो.”
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये जोश लिटलची कामगिरी शानदार होती. अशा परिस्थितीत २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात लिटल हा सर्वात आश्चर्यकारकपणे महागडा खेळाडू ठरू शकतो. या युवा खेळाडूने सात सामन्यांत १७.१८ च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या, त्यात न्यूझीलंडविरुद्धच्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे.