एकीकडे महाराष्ट्रात रोजच नवनव्या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी धक्कातंत्राचा वापर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं पत्र समोर आलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार 2019 साली स्थापन झालं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सरकारचे मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आमदारांनंतर शिवसेनेच्या खासदारांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेच्या आमदारांसोबतच खासदारांनीही या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त आमदार आणि खासदारच नाही तर शिवसेनेचे पदाधिकारीही जात आहेत, त्यातच आता राष्ट्रवादीने अचानक सर्व विभाग आणि सेल्सना तडकाफडकी बरखास्त केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.