टीम इंडियाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराची बॅट काऊंटी क्रिकेटमध्ये तुफान चालत आहे. मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात पुजाराने डबल सेंच्युरी केली आहे. आतापर्यंत पुजारा 230 रन करून मैदानात उभा आहे. 399 बॉलचा सामना करत पुजाराने 21 फोर आणि 3 सिक्स मारल्या. या मॅचदरम्यान पुजाराने इतिहास घडवला आहे. 118 वर्षांच्या ससेक्सच्या काऊंटी क्रिकेटच्या इतिहासात पुजारा एका मोसमात तीन द्विशतकं करणारा पहिला खेळाडू आहे. पुजाराच्या आधी अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला हा विक्रम करता आला नव्हता.
पुजारा मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात ससेक्स टीमचा कर्णधार म्हणून खेळत आहे. मंगळवारीच पुजाराने त्याचं शतक पूर्ण केलं होतं. आज तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा 115 रनपासून त्याने बॅटिंगला सुरूवात केली. यानंतर त्याने अनेक उत्कृष्ट शॉट मारले आणि सिझनचं तिसरं द्विशतक झळकावलं.
मिडलसेक्सविरुद्धच्या 38 व्या सामन्यात टॉम हेन्सऐवजी पुजाराला कर्णधार करण्यात आलं आहे. भारतीय टेस्ट टीमचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पुजाराने या मोसमातल्या 7 काऊंटी सामन्यांमध्ये 5 शतकं केली आहेत. ससेक्सने त्यांच्या पहिल्या दोन विकेट 99 रनवर गमावल्या होत्या, यानंतर पुजाराने टॉम असलोपसोबत 219 रनची पार्टनरशीप केली. टॉम असलोप 135 रनवर आऊट झाला.
चेतेश्वर पुजाराने भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये 96 सामन्यांच्या 164 इनिंगध्ये 43.8 च्या सरासरीने 6,792 रन केले. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 18 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत. टेस्टमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 206 रन आहे.