विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. त्याने काही वेळापूर्वीच कर्णधारपद सोडत असल्याचे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci)असे चित्र निर्माण झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असे सांगितले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने (Bcci) त्याच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचेही कर्णधारपद काढून घेतले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचेही दिसून आले. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.
संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.
मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार. असे ट्विट त्याने केले आहे.