नाशिक जिल्ह्याला सिन्नर आणि निफाड तालुक्याने अक्षरशः जेरीस आणले आहे. सध्या सिन्नर येथे 162 आणि निफाड येथे 160 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकूण 772 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 968 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सहाने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 58, बागलाण 3, चांदवड 30, देवळा 3, दिंडोरी 18, इगतपुरी 4, कळवण 8, मालेगाव 3, नांदगाव 11, निफाड 160, पेठ 1, सिन्नर 162, त्र्यंबकेश्वर 2, येवला 69 असे एकूण 532 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 231, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 16 तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्ण असून असे एकूण 772 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 389 रुग्ण आढळून आले आहेत.
सिन्नर तालुक्यात आतापर्यंत 508 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनलॉकनंतर येथील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आली आहे. सध्या तालुक्यातील 50 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, दुसरीकडे सिन्नर तालुक्यात लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यात 1 लाख 63 हजार 408 म्हणजे पात्र व्यक्तींपैकी 59 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 58 हजार 146 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. टक्केवारीत हे प्रमाण जवळपास 21 टक्के इतके आहे. आतापर्यंत साधारणतः 2 लाख 21 हजार 554 जणांना डोस देण्यात आला आहे. वाढते कोरोना रुग्ण पाहता हे लसीकरण वाढवण्यात येणार आहे.
उत्तर महाराष्ट्राला कोरोनाने तूर्तास दिलासा दिला असून, विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चक्क 97.63 टक्क्यांवर गेले आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे.