जनरल अरुण वैद्य खून खटल्यातील दुर्लक्षित जीवन जगत असलेला साक्षीदार आदिनाथ साळवे (वय 65) याला, चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ यांनी मदतीचा हाथ देऊन त्यांच्या मानसिक-सामजिक पुनर्वसनाची जबादारी घेतली आहे. आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे हे पोलीस कमिशनर कार्यालयाजवळील रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अनेक वर्षांपासून बेघरपणाचे दुर्लक्षित आयुष्य जगत आहेत. संदर्भातील बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसिध्द केली व मानवीहक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या निदर्शनात हे वास्तव येताच त्यांनी आत्माराम याची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. नंतर त्यांनी चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेंल्थ या मानसिक रुग्णांसाठी कार्यरत संस्थेचे अध्यक्ष रोनी जॉर्ज यांना आत्माराम साळवे याला मदत करावी अशी विनंती केली आणि त्यांनी लगेच ती मान्य करून आत्माराम ला पुनर्वसनाची संधी मदत म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
10 ऑगस्ट 1986 हा दिवस आत्माराम साळवेचे आयुष्य बदलविणारा ठरला. रस्त्यावर फुगे व इतर खेळणे विकणाऱ्या आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे यांच्या नजरेसमोर माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य याच्यावर खलिस्तानवादी अतिरेकी सुखदेव उर्फ सुखा आणि हरजिंदर सिंग उर्फ जिंदा यांनी मोटर सायकलवरून येऊन गोळीबार केला. जनरल वैद्य त्याच्या कार मधून क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते.
जनरल वैद्य यांच्यावर तीन वेळा गोळीबार करून जिंदा व सुखा हे पळून जाण्यास यशस्वी ठरले. गोळीबार करताना व पळून जाताना जिंदा व सुखा यांना पाहणारे आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे ह्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी महत्वाचे साक्षीदार ठरले. आज 65 वर्षीय आत्माराम साळवे मानसिक अनारोग्याचा सामना करीत आहेत असेही काही जणांना जाणविले.
आत्माराम हे उत्तम बासरी वादक आहेत. जेव्हा जिंदा व सुखा यांच्याविरुद्ध खटला सुरु होता तेव्हा आत्माराम साळवे यांना पोलीस संरक्षण होते परंतु दुर्दैवाने त्यांना आज कोणतेही संरक्षण नसून ते निर्वासित जीवन ते जगत आहेत. चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेंल्थ तर्फे सामाजिक-मानसिक पुनर्वसनासाठी (सायको-सोशल रीह्याबिलीटेशन) आत्माराम साळवे यांना महिती देऊन त्यांची जबाबदारी घेण्यात आल्याचे चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ समन्वयक राहुल शिरुरे यांनी दिली.