रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती

श्रीलंकेमध्ये नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. २२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मतं मिळाली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. परिणामी राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. यानंतर आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.