कोरोनाव्हायरसचे संकट अधिक गडद होत चालले आहे त्याचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहे. अलीकडेच फ्रान्समध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता जर्मनीमध्ये देखील लॉकडाउन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीनेही याच पद्धतीचा निर्णय घेत पाच दिवसांचे कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाउनची घोषणा केल्याचं वृत्त आहे. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर घोषणा केलीय.
चान्सरल अँगेला मर्केल यांनी देशभरातील वेगवेगळ्या प्रांतामधील १६ नेत्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी एक एप्रिल ते पाच एप्रिलदरम्यान देशात लॉकडाउन लागू करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. याचप्रमाणे या बैठकीमध्ये संस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या मोठ्या सामन्यांच्या आयोजनावरही १८ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या या लॉकडाउनदरम्यान देशातील जवळजवळ सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. ईस्टरच्या प्रार्थनासभाही ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यासंदर्भातील आदेश आणि सुचना जारी करण्यात आल्या आहेत. भाज्या आणि अन्नधान्यांची दुकानं तीन एप्रिल रोजी एका दिवसासाठी उघडण्याची परवानगी देण्यात आलीय.
आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रांतामधील १६ लोकप्रतिनिधिंशी जवळजवळ १२ तास चर्चा केल्यानंतर मर्केल यांनी, “परिस्थिती खूपच गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आयसीयू बेड्सही पुन्हा भरु लागलेत. १६ नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर आम्ही ईस्टरदरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करत आहोत. काहींना परवानगी देऊन काहींवर निर्बंध लादण्यात अर्थ नसल्याचं मत अनेक नेत्यांनी व्यक्त केल्यानंतर सर्वांवरच कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय,” असं सांगितलं.