महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा कार्यपद्धतीमध्ये समावेश असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत घेतली जाणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २१ मे ते १० जून आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होणार आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ४० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटे आणि ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून दिली जाणार असून, परीक्षांच्या बदललेल्या वेळांनुसार सुधारित वेळापत्रक राज्य मंडळाने www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे