कोरोनाच्या उद्रेकाने कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. सांगलीत 13 तासात आई,वडील आणि तरुण मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यानंतर तिकडे नाशिकमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर नेमबाज प्रशिक्षक मुलीचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
धक्कादायक म्हणजे मोनाली यांच्या निधनाच्या काही तास आधी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांना काही तासांच्या कालावधीत कोरोनाने हिरावलं.
मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. इतंकच नाही तर श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
सांगली हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 तासात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला घातला. अवघ्या 13 तासात सगळं कुटुंब कोरोनाने हिरावलं.
पहाटे 5 वाजता वडील, तर संध्याकाळी 5 वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे 13 तासात कुटुंब उध्वस्त झाले आहे. तर आठ दिवसांपूर्वी चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.