आज दिवसभरातील ठळक घडामोडी अश्या …..
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
पत्रामुळे तरुणांमध्ये संभ्रम
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे.असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपूर्वी अंतिम वर्षाची गुणपत्रक सादर करणे आवश्यक असल्याचे पत्र आयोगाने पाठवले आहे.संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून गोंधळ सुरू झाला.परीक्षांबाबतचा वादंग जवळपास सहा महिने सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तरी त्याच्या नियोजनातही गोंधळ झाला. त्यामुळे दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार मे महिन्यापर्यंत संपणाऱ्या अंतिम परीक्षा गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्या.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
आपल्या मधाळ आवाजाने रसिकांच्या हृदयावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करणाऱ्या, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०२० या वर्षासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
11 वर्षाखालील मुलांनाही देणार
कोरोना प्रतिबंधक लस
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील लसीची चाचणी सुरू केल्याची माहिती फायजर कंपनीने दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचं स्पष्ट केलं आहे. सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने आम्ही फायझर-बायोएनटेक कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी बालकांना लस दिली आहे,” असं कंपनीने म्हटलं आहे.
दहावी किंवा बारावीच्या कोरोना बाधित
विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
स्वतः किंवा कुटुंबातील कुणी कोरोना बाधित असेल आणि जे विद्यार्थी इयत्ता दहावी किंवा बारावीच्या परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मोठा खुलासा झाला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परिक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार असून त्यांचे वर्ष वाया जाणार नाही. तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर इ. १२ वी ची परीक्षा दि.२३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षेचे त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे.
ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालय आगीत
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत
भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी
५० आठवडे ‘किशोर गोष्टी’
गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणार्या किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालभारतीने किशोर गोष्टी हा अनोखा कार्यक्रम हाती घेतला आहे.’ या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक ‘किशोर’मध्ये प्रकाशित झालेली त्यांची गोष्ट मुलांना सांगणार असून, २७ मार्चपासून शनिवारी ११ वाजता मुलांना गोष्ट ऐकता आणि पाहता येईल.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना
२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दिल्लीतील काही लोक
युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवर यूपीए बळकट होण्यासाठी त्याचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील व्यक्तीकडे दिलं पाहिजे. शरद पवार हे अशी क्षमता असलेले नेते आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
रूग्णालयात दाखल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज (शुक्रवार) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे. छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन
हटवण्याचा निर्णय कायम
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाचा १८ डिसेंबरचा निर्णय रद्द केला आहे ज्यामध्ये सारयस मिस्त्री यांना पुन्हा एकदा टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला दिलासा दिला असून सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या न्यायालयीन संघर्षांत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महत्वाचा निर्णय दिला. दरम्यान रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
SD social media