परीक्षा रद्द करून सरकारने
शिक्षणाची थट्टा चालवली : उच्च न्यायालय
दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं असून दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. ते सिंधुदूर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आरबीआय देणार केंद्र सरकारला
खजान्यातील ९९,१२२ कोटी रुपये
करोना संकटात आरबीआयनं केंद्र सरकारला खजान्यातील ९९,१२२ कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने मोठा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारचा दिलासा मिळणार आहे. बोर्डाच्या बैठकीत ९९,१२२ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. जुलै २०२० ते मार्च २०२१ या ९ महिन्यांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदींचा फोटो असणारी लसीकरण
प्रमाणपत्र देणार नसल्याचं स्पष्ट
करोना लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भाजपाचा मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने याला विरोध केलाय. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगड आणि झारखंडमधील सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याची येणारी मोदींचा फोटो असणारी लसीकरण प्रमाणपत्र देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगडमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करुन घेण्यासाठी वेगळं पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.
प्रदूषण घटले सहारनपूरमधून थेट
हिमालयाची शिखरं दिसू लागली
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेत उडणारे सुक्ष्म कण नष्ट झाले आहेत. दृश्यमानता वाढली आहे. त्यामुळे सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरं दिसू लागली आहेत. थेट हिमालयाचं दर्शन होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. इतक्या लांबून घेतलेले हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भारतीय हवाई दलाचे
लढाऊ विमान मिग २१ क्रॅश
पंजाबच्या मोगा येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग २१ क्रॅश झाले. प्रशिक्षणासाठी पायलट अभिनवन यांनी राजस्थानच्या सूरतगडहून मिग-२१ ने उड्डाण घेतले होते. या दरम्यान पश्चिम क्षेत्रात ते कोसळले. यामध्ये विमानाचे पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अभिनव यांच्या मृत्यूवर हवाई दलाने शोक व्यक्त केला आहे.
चिपको आंदोलनाचे प्रणेते
सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन
चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. करोनामुळे त्यांच्यावर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पर्यावरण आंदोलनं आणि संघटनांचं मोठं नुकसान झालं आहे.
एका महिन्यात तब्बल पाच कोटी
पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये औषधांची मागणी वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याबरोबरच औषधांची मागणीही वाढताना दिसत आहे. उत्तराखंडमधील कुमाऊ प्रांतामध्ये मागील काही काळापासून सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथे एका महिन्यात तब्बल पाच कोटी पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. तर करोनावर उपाचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांच्या विक्रीचे आकडे दोन कोटींहून पुढे गेलेत.
अपयश लपवण्यासाठी बनारस
मॉडेलचा प्रचार : नवाब मलिक
देशात बनारस मॉडेल चर्चेत आलं. पण या मॉडेलवरून आता राजकारण पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अपयश लपवण्यासाठी हा प्रचार सुरु असल्याचे म्हटले आहे.
नवाब मलिक म्हणाले, “देशात कोविडशी लढण्यासाठी बनारस मॉडेल एक मोठं मॉडेल बनवतील, असा प्रचार सुरु आहे. मात्र आम्हाला वाटते अपयश लपवण्यासाठी हा प्रचार सुरु आहे. बनारसच्या घाटावर तर मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा नव्हती”
पुढच्या दशकामध्ये कोविड १९
आजाराची तीव्रता कमी होईल
आत्ताचा हा करोनाचा विषाणू मानवी शरीरावर आणि रोगप्रतिकारशक्तीवर कशा पद्धतीने परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेतल्या उटाह विद्यापीठातले गणित आणि जैवविज्ञानाचे प्राध्यापक फ्रेड अॕडलर यांनी सांगितलं की, या संशोधनावरुन लक्षात येत आहे की अजूनही आपल्याला भविष्याबद्दल काहीही अंदाज आलेला नाही. पुढच्या दशकामध्ये या कोविड १९ आजाराची तीव्रता कमी होईल कारण तोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये त्याला प्रतिकार करण्याची क्षमता तयार झाली असेल. या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, या आजारात होणारे बदल हे विषाणूच्या स्वरुपामुळे होत नसून आपल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे होत आहेत.
तृणमूलच्या नेत्यांना
नजरकैदेत ठेवण्याचे आदेश
नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणातील अटकेत असलेल्या तृणमूलच्या नेत्यांचा जामीन कोलकाता हायकोर्टाने नाकारला आहे. हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यायालयाने अटकेतील आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फिरहाद हकीम, सुब्रत बॅनर्जी, मदन मिश्रा आणि सोवन चॅटर्जी हे त्यांच्या घरी नजरकैदेत राहणार आहेत.
तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान
१५ शिक्षक कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात काही निर्बंधासह लॉकडाउन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी करोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र राजकीय मंडळीचं करोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान १५ शिक्षक कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर शेकडो जणांना करोनाची लागण झाली आहे. असाच प्रकार मध्य प्रदेशात देखील समोर आला आहे. दमोहमधील पोटनिवडणूक लोकांसाठी प्राणघातक ठरली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून
तरुण तेजपालची निर्दोष मुक्तता
तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांच्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता. तरुण तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप त्यांच्यावर होता
आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना
मदत करु : मुख्यमंत्री
तोक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे दिली. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळ नुकसानीचा प्राथमिक आढावा मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत येथे घेतला. चक्रीवादळाने जिल्ह्यातील ५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.
भारत सरकारने ४०, ३०० वेळा युजर्सचा
डाटा मागितला, फेसबुकचा दावा
भारत सरकारने २०२० च्या दुस-या सहामहीमध्ये ४०, ३०० वेळा युजर्सचा डाटा देण्याची मागणी केली होती, असा दावा जगातील सर्वात मोठे सोशल मीडियाचे व्यासपीठ असलेल्या फेसबुकने केला आहे. कंपनीच्या नैतिक (एथिक्स) समितीच्या या अहवालानुसार, अमेरिकेने सर्वाधिक म्हणजेच ६१,२६२ वेळा विनंती केल्यानंतर भारताने केलेले आग्रह दुस-या स्थानावर आहे.या अहवालानुसार, भारताकडून पहिल्या सहामहीमध्ये ३५,५६० वेळा केल्या गेलेल्या मागणीच्या
आकड्यांपेक्षा नंतर केल्या गेलेल्या मागण्या १३.३ टक्के अधिक आहे.
देशात 50 टक्के लोक अजूनही
मास्क वापरत नाही : आरोग्य मंत्रालय
लोकांना फक्त आवश्यक गोष्टींसाठी घराबाहेर जाण्याचे आवाहन केले जात असून बाहेर जाताना सर्वांनी मास्क घालावे आणि सामाजिक अंतराचे पालन केले पाहिजे, असे वारंवार सांगण्यात येते, परंतु निम्मे लोक या गोष्टीचे पालन करत नाहीत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार सुमारे ५० टक्के लोक अजूनही मास्क लावत नाहीत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, एका अभ्यासानुसार सुमारे ५० टक्के लोक अजूनही मास्क परिधान करत नाहीत, तर मास्क घालणाऱ्यापैकी ६४ टक्के लोक आपले नाक झाकत नाहीत. तसेच देशातील ८ राज्यांत १ लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण प्रकरणे असून ९ राज्यांत सुमा ५० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत.
अमेरिकेच्या दबावापुढे
इस्राईलची माघार
अमेरिकेच्या दडपणापुढे इस्राईलला झुकावे लागले आहे आणि गेल्या ११ दिवसांपासून गाझापट्टीवर सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठी तयार झाला आहे. अमेरिकेत व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी हा घटनाक्रम उत्साहजनक असल्याचे म्हटले आहे.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सिक्युरिटी कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मंजुरी प्रदान करण्यात आली. हमासचे मुख्य कमांडरने युद्धविराम होण्याची शक्यता वर्तवली होती. ते म्हणाले होते की, ‘मला वाटतं संघर्ष विरामासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मला आशा आहे की आपसातील सहमतीवरून एक-दोन दिवसांमध्ये संघर्ष विराम होण्यासाठी करार होऊ शकतो.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या
हालचालींवर बारीक लक्ष
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. पंजाब आणि राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत वाद सुरु असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (युपीए) मधील अन्य घटक पक्ष देखील काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला सर्वाधिक संशय हा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि त्यांच्या एकूण हालचालींवर आहे.
काही राज्यांमध्ये काँग्रेस हा युतीतील सर्वात मोठा पक्ष असूनही राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील हालचालीमुळे काँग्रेस आपले वर्चस्व गमावू शकते, अशी शंका काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. .
‘महापारेषण’ च्या संचालक भरती प्रक्रियेत
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हस्तक्षेप
‘महापारेषण’ च्या संचालक पदावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप सुरूच असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया तातडीने रोखावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाठक यांनी सांगितले की, महापारेषणच्या संचालकपदाच्या नियुक्तीसाठी राज्य वीज मंडळाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
दहशतवाद्याला सहकार्य करणारे
डीएसपी बडतर्फ
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बाबू याच्यासाठी काम करणारे निलंबित डीएसपी देविंद्र सिंह तसेच देशविरोधी कामात आढळलेल्या दोन सरकारी प्राध्यापकांना जम्मू-काश्मीर सरकारकडून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी हे लोक धोकादायक असल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. गेल्या एक महिन्या दरम्यान दहशतवादी आणि देशविरोधी कामे करणा-या जवळपास ६ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सेवामुक्त झाले आहेत. यामध्ये एका प्राध्यापकांचा सहाय्यक आणि एक नायब तहसीलदाराचा समावेश आहे.
कर भरण्याची
मुदत वाढविली
सामान्य करदाता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत रिटर्न भरू शकणार आहेत. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे सरकारने हा निर्णय घेतलाय. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे कंपन्या आणि सामान्य करदात्यांशी संबंधित अनेक करांच्या तारखांची मुदत वाढविण्यात आली आहे.
देशांतर्गत बाजारात
सोन्याच्या किंमती खाली
चार दिवसांत आज (21 मे) पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरले आहेत. सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमती खाली उतरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय किंमतीतील घसरणीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती 0.40 टक्क्यांनी घसरल्या. त्याच वेळी जुलै वायदा चांदीच्या किंमतीत 0.80 टक्क्यांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इक्विटी मार्केटमधील वाढीदरम्यान सोन्याच्या किंमती खाली आल्या. परंतु, डॉलरच्या घसरणीमुळे ही घट मर्यादित राहिली.
5जी नेटवर्कमुळे कोरोना
होत असल्याच्या अफवा
गेल्या काही दिवसांपासून 5जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच विजय वर्धन यांनी दिला आहे. तसेच देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.
आता सीपीएल सुरू
होणार 28 ऑगस्ट पासून
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित झाल्यामुळे क्रिकेट रसिक निराश झाले. परंतु त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची घोषणा केली आहे. त्यामुळे युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन यांचं वादळ पुन्हा मैदानात घोंघावणार आहे. 28 ऑगस्टला स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सीपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
SD social media
9850 60 3590