कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

देशातील प्रमुख बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विमानतळाचं लोकार्पण केल्यानंतर मोदी थेट महानिर्वाण मंदिरात पोहोचले. मोदी आज कुशीनगरमध्ये एका मेडिकल कॉलेजसह विविध विकास कामांचं भूमिपूजनही करणार आहे.

कुशीनगर हे आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ आहे. याच ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं. त्यामुळे कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या एअरपोर्टवर बौद्ध भिक्षूंसह कोलंबोहून पहिली फ्लाईट आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या विमानतळाचं लोकार्पण केलं. यावेळी श्रीलंकेचे मंत्री नमल राजपक्षे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह शेकडो बौद्ध भिक्षू उपस्थित होते.

या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महापरिनिर्वाण मंदिरात पोहोचले आहेत. या ठिकाणी अभिधम्म दिवस साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोदी महापरिनिर्वाण मंदिरात पोहोचले आहेत. या ठिकाणी गुजरातच्या वडनगर आणि इतर ठिकाणी उत्खननात सापडलेल्या अजिंठा भित्तीचित्रं, बौद्ध सूत्रं सुलेख आणि बौद्ध कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्याची पाहणीही मोदींनी केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ परिसरात बोधी वृक्षाचं रोपणही केलं. मोदींनी स्वत: बोधी वृक्षाचं रोपण करून त्याला पाणी घातलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.

विमानतळ, हेलीपोर्ट्स आणि वॉटर डोमचे नेटवर्क बनेल
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवादही साधला. येत्या 3-4 वर्षात देशात 200 हून अधिक विमानतळ, हेलीपोर्ट्स आणि वॉटर डोमचं जाळं विणण्यात येईल. येत्या काही आठवड्यात स्पाईस जेट दिल्ली ते कुशीनगर दरम्यान विमान सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना त्याचा फायदाच होईल, असं मोदींनी सांगितलं.

संपूर्ण भारताचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना आम्ही आश्वस्त करत आहोत. भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीपासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणाची साक्षीदार असलेलं हे स्थळ आता संपूर्ण जगाशी जोडलं गेलं आहे. श्रीलंकन एअरलाईन्सचं विमान कुशीनगरमध्ये लँडिंग होणं म्हणजे या भूमीला वंदन करण्यासारखच आहे, असं सांगतानाच कुशीनगर विमानतळ हे जगभरातील बौद्धांसाठी आहे, असं मोदींनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.