मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सुप्रीम कोर्टात तारखेवर तारखा मिळत आहेत, त्याच्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे त्यावर चर्चा झाली. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यावरही चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता, असंही ते म्हणाले. पुढे अहिर म्हणाले, शेतकऱ्यांकरता कष्टकऱ्यांकरता हे सरकार काय निर्णय घेत आहे? शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान,दहीहंडीवेळी सातव्या थरावरून कोसळलेल्या गोविंदाचा सोमवारी मृत्यू झाला आहे. शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया देताना सचिन अहिर म्हणाले, की गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
यावरुन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. ते म्हणाले, एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. जांभोरी मैदानमध्ये ज्यांनी नियोजन केलं त्यांनी खाली गाद्या ठेवल्या नाहीत. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था नव्हती. मंडळाच्या लोकांनी त्याला ऍडमिट केलं, पण दुर्दैवाने या जखमी गोविंदांकडे बिल मागितले जात होतं. लहान मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी घेता येत नाही, तरीही गोविंदांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता. थरांची उंचीदेखील मर्यादित ठेवली पाहिजे होती. मात्र ते देखील पाळलं नाही. उंचीला स्पर्धा नका करू. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पक्षातला कोणीही या गोविंदांना जाऊन भेटून आला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
अहिर पुढे म्हणाले, की विधिमंडळात काय चाललंय याबद्दल आमदारांशी चर्चा केली आणि आढावा घेतला गेला. ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, मात्र शासन म्हणून हे का मान्य होत नाही, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. पक्ष संघटनेबाबतही आढावा घेतला गेला.