टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांचा पुण्यातील मित्र थेट टेस्लाच्या ऑफिसमध्ये पोहोचला आहे. मस्क यांचा ट्विटरवरील मित्र आयटी प्रोफेशनल प्रणय पाथोळेने टेक्सासमधील गिगाफॅक्टरी येथे त्यांची भेट घेतली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणारा पाथोळेने सोमवारी एक ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
इलॉन मस्क यांनी प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. गीगाफॅक्टरी टेक्सास येथे इलॉन मस्क यांच्यासोबत झालेली भेट खूप छान होती. इतकी नम्र आणि साधी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात, असं प्रणयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याने मस्क यांच्यासोबत काढलेला फोटो देखील शेअर केला आहे.
इलॉन मस्क आणि प्रणय पाथोळे हे 2018 पासून Twitter वर मित्र आहेत आणि स्पेस ते कार आणि बऱ्याच काही विषयांवर ते चर्चा करत असतात.
कोण आहे प्रणय पाथोळे?
प्रणयने 2018 मध्ये, अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षात शिकत असताना टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना टेस्लाच्या स्वयंचलित विंडस्क्रीन वायपर्समधील त्रुटींबद्दल ट्विट केले, ज्याला मस्कने त्वरीत उत्तर दिले की ही समस्या वाहनांच्या पुढील बॅचमध्ये नसेल. तेव्हापासून प्रणय ट्विटरवर इलॉन मस्क यांच्या सतत संपर्कात होते. प्रणय आता टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहेत. प्रणयचे ट्विटरवर 1.6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.