टीम इंडियानं झिम्बाब्वेविरुद्धची तिसरी वन डे जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पण सिकंदर रझाच्या खेळीनं भारताच्या तोंडाला फेस आणला होता. रझानं 95 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 115 धावा फटकावल्या. पण 49व्या षटकात शार्दूलनं रझाला माघारी धाडलं आणि भारताचा विजय सोपा केला. भारतानं या सामन्यात झिम्बाब्वेसमोर 290 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 13 धावा दूर राहिला. झिम्बाब्वेनं 49.3 षटकात सर्व बाद 276 धावांची मजल मारली.
रझाची झुंजार खेळी
290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची एक वेळ 7 बाद 169 अशी अवस्था झाली होती. पण रझानं ब्रॅड इव्हान्सच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी साकारली. रझानं आपल्या वन डे कारकीर्दीतलं पाचवं शतक पूर्ण केलं. पण अखेरच्या दोन षटकात झिम्बाब्वेला 15 धावा हव्या असताना हे दोघंही लागोपाठ बाद झाले. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयापासून दूर राहावं लागलं.
त्याआधी भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेसमोर भलं मोठं आव्हान उभं केलं होतं. भारतीय संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 289 धावांचा डोंगर उभा केला. युवा फलंदाज शुभमन गिलचं शतक हे भारतीय डावाचं वैशिष्टय ठरलं. गिलनं या दौऱ्यातला आपला फॉर्म कायम ठेवताना आज शतकी खेळी साकारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पहिलंवहिलं शतक ठरलं. त्यानं 97 चेंडूत 130 धावा फटकावल्या. तर ईशान किशननं 50 धावांची खेळी केली.
शुभमन-ईशानची शतकी भागीदारी
टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. पण आज राहुलनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि कर्णधार राहुल या जोडीनं 63 धावांची सलामी दिली. धवन 40 तर राहुल 30 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर शुभमन आणि ईशान किशन या जोडीनं खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची दमदार भागीदारी साकारली. शुभमननं 82 चेंडूत आपलं शतक साजरं केलं. तर ईशाननं 61 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावांचं योगदान दिलं.