करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला, यानंतर लगेचच करुणा शर्मा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या, त्यामुळे या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं.
‘हे सरकार बदलल्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. सरकार बदलल्यामुळे खूश आहे, मला एकनाथ शिंदेंकडून न्यायाची अपेक्षा आहे. मला 16 दिवस जेलमध्ये टाकलं गेलं. मी आत्महत्या करावी, माझ्या मुलांनी आत्महत्या करावी यासाठी आम्हाला उसकावलं जात आहे. मी या गोष्टींना घाबरत नाही. माझ्यावर खोट्या एट्रॉसिटीच्या केस टाकण्यात आल्या. मला धमक्या देण्यात येत आहेत. आधी मला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली,’, असं करुणा शर्मा मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर म्हणाल्या.
दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिलं आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये मी सगळे उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडेंनी मला हरवून दाखवावं, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलं आहे.
कोण आहेत करुणा शर्मा?
करुणा शर्मा या आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं. तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला होता. करुणा शर्माची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर करुणा शर्मा अनेकवेळा चर्चेत आल्या.
मुख्यमंत्र्यांचा निशाणा
ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला.