केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत ब्लॅक फंगसची औषधं जीएसटी मुक्त करण्याला मंजूरी देण्यात आली आहे. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे आता पूर्णपणे जीएसटी मुक्त असणार आहेत. याशिवाय कोरोनासंबंधित इतर औषधांवरील जीएसटी 12 वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. 30 सप्टेंबर 2021पर्यंत जीएसटी कपातीचा निर्णय लागू राहणार असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
रेमडेसिवीरील जीएसटी कमी करून 5 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय बायपॅप मशीन, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, कोविड टेस्टिंग किट, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्सवरील जीएसटी कपात करून 5 टक्के करण्यात आली आहे.
जीएसटी काऊंसिलने कोरोना व्हॅक्सिनवरील 5 टक्के जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 75 टक्के लसीची खरेदी करतं, त्यावर जीएसटीही सरकार भरतंय. त्यामुळे याचा सामान्य जनतेला फटका बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
रुग्णवाहिकेवर सध्या 28 टक्के जीएसटी आकारला जातो. तो कमी करुन 12 टक्के इतक करण्यात आला आहे. कोरोनाशी संबंधित ज्या गोष्टींवर सूट देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना उद्या जारी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जीएसटी काऊंसिलची 44वी बैठक व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याबरोबरच अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत नव्याने जाहीर करण्यात आलेली कपात लागू असणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होणार आहे.