वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी हे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून जाण्याला शिंदे सरकार आणि भाजपला जबाबदार धरलं आहे, तर शिंदेंकडून तत्कालिन महाविकासआघाडी सरकारवर आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरिट मिळणार होती, आपण मेरिटमध्ये पास झालो होतो, पण केंद्र सरकार आपल्याकडून काढून घेत आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे’, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला असला तरी भविष्यात यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला मिळेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे, त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंवर प्रहार केला.
‘मोठ्या प्रोजेक्टचं आश्वासन मिळालं असेल तर, एकनाथ शिंदेंनी थोडे दिवस त्यांचं पद अजितदादा पवारांना द्यावं, तुम्हाला आम्ही दुसरं पद देतो, तयार आहेत का ते? अजितदादांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदेंना आम्ही दुसरं मोठं पद देतो. त्यांना जशी ऑफर मिळाली आहे, तशी ऑफर मी त्यांना देते,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी विमानात बसावं दिल्लीला जावं, ऑन मेरिट आम्हाला जे मिळालं होतं, ते आमच्याकडे राहिलं पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.
‘बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. तरुण शिकलेले आहेत, पण त्यांना रोजगार मिळत नाही. दीड लाख जणांना रोजगाराची थेट संधी मिळणार होती. याशिवाय या प्रोजेक्टशी संबधी मिळून 3 लाख नोकऱ्या मिळणार होत्या. हा प्रोजेक्ट आला असता तर 30 हजार कोटींचा जीएसटी सरकारला मिळाला असता,’ असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.