अण्णा भाऊ व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ! ; देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार; मॉस्कोत लोकशाहिरांच्या पुतळय़ाचे अनावरण

पीडीत, शोषित व वंचितांसाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी बरीच साहित्यसंपदा निर्मितीही केली. त्यांनी आयुष्यभर केलेले मोठे संस्थात्मक कार्य पाहता, ते  केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठच होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले.

रशियातील मॉस्को येथील ‘मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ च्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे अनावरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अमित गोरखे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे मॉस्कोमध्ये अनावरण करण्याची संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. अण्णा भाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी आयुष्यभर कार्य केले. सामाजिक परिस्थितींमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण मोठी साहित्यनिर्मितीही केली. एकही दिवस शाळेत न गेलेल्या किंवा पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएच. डी करीत आहेत. मॉस्को राज्य ग्रंथालयाच्या या उपक्रमात मुंबई विद्यापीठाने सहभाग घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामान्य माणसाला जगण्याची ताकद व प्रेरणा मिळते. ‘फकिरा’तून अनेक कथा त्यांनी पुढे समाजापुढे आणल्या. त्यांनी अनेक संघर्षशील व्यक्तिमत्त्वे जगापुढे आणली. त्यांनी रशियाचा दौरा करून रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियातील क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्मृती आज याठिकाणी उभ्या राहत आहेत. हा त्यांच्या कार्याचा व मराठी जनांचा मोठा गौरव आहे, असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.