ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांची अंत्ययात्रा बकिंगहॅम प्रासाद ते वेस्टमिन्स्टर सभागृहापर्यंत निघाली. परंपरेनुसार तोफेच्या गाडीवर त्यांची शवपेटी ठेवण्यात आली. त्यांचे उत्तराधिकारी, ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे, दोन्ही राजपुत्र विल्यम आणि हॅरी शवपेटीच्या बाजुने चालत होते. तर शाही परिवारातील अन्य सदस्यही गाडीच्या मागून चालत गेले.
अंत्ययात्रा सुरू असताना लंडनवासियांनी सत्र्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. वेस्टमिन्स्टर इथे कॅँटबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी एलिझाबेथ यांचे पार्थिव स्वीकारले. त्यानंतर प्रार्थना करण्यात आली आणि स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सभागृहाचे दरवाजे उघडण्यात आले. आता सोमवार संध्याकाळपर्यंत सर्वसामान्य ब्रिटीश नागरिकांना आपल्या लाडक्या राणीचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यासाठी हजारो नागरिकांनी ब्रिटनचे संसदभवन असलेल्या विस्टमिन्स्टर इमारतीबाहेर रांग लावली आहे. सोमवारी संध्याकाळी एलिझाबेथ यांचे पार्थिव जवळच्याच वेस्टमिन्स्टर अॅबे या चर्चेमध्ये नेण्यात येईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
अंत्यसंस्कारास मुर्मू उपस्थित राहणार
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपती १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान लंडन दौरा करतील. परराष्ट्र मंत्रालयातर्फे बुधवारी ही माहिती देण्यात आली. महाराणींवर १९ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.