पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उझबेकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) पार्श्वभूमीवर दोन्ही नेते स्वतंत्र बैठक घेतील. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर दोघांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असेल.
गुरूवारी आणि शुक्रवारी उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओ २२वी बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात शिखरबैठक होणार असल्याचे रशियाने जाहीर केले आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रे, जी-२०मध्ये सहकार्य, आशिया प्रशांत भागातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला भारताच्या परराष्ट्र खात्याने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पंतप्रधान जिनपिंग यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक करण्याची शक्यता आहे.
मोदी-शरीफ भेट नाहीच?
पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यामध्ये द्वीपक्षीय चर्चा होण्याची शक्यता मावळत चालली आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने याबाबत अद्याप काही माहिती दिली नसली, तरी अशा बैठकीची शक्यता नसल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे.
भूतानचे राजे- नरेंद्र मोदींची भेट
भूतानचे राजे जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी उभय पक्षीय संबंधांवर चर्चा करून, आगामी काळात ते अधिक दृढ करण्यावर भर दिला. ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला सहभागी होण्यासाठी वांग्चुक लंडनला जात असताना भारतात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.