आज दि.१२ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर

मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

मेळघाटात भीषण अपघात टळला; बस दरीत उलटून झाडांना अडकली

परतवाडा ते धारणी राज्‍य महामार्गावर अमरावतीहून मध्‍यप्रदेशातील खंडवा येथे जाणारी एसटी बस मेळघाटातील घटांग नजीक अनियंत्रित होऊन रस्‍त्‍याच्‍या कडेला दहा ते बारा फूट दरीत उलटली. ही बस झाडांना अडकल्‍याने मोठा अपघात टळला. या अपघातात बसचालकासह ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्‍याने हा अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

अमरावती- खंडवा ही एसटी महामंडळाच्‍या अमरावती आगाराची बस परतवाडा येथून निघाल्‍यानंतर सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास घटांग नजीक एका वळणावर दरीत उलटली. या अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा, परतवाडा तसेच समरसपुरा पोलीस ठाण्‍याचे कर्मचारी तातडीने अपघातस्‍थळी पोहोचले. बसमध्‍ये एकूण ६४ प्रवासी होते. बसचालक मोहम्‍मद मुजाहिद याच्‍यासह ७ प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाले.

कोल्हापूरच्या ‘शासन आपल्या दारी’साठी सांगलीच्या १०० बस नागरिकांच्या दारात

कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मंगळवारी होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील आगाराच्या १०० बस नागरिकांच्या दारी धावणार आहेत. कोल्हापूर मध्ये मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ‘शासन आपले दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी व्हावी याकरिता प्रयत्न युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. कार्यक्रमास येण्यासाठी नागरिकांना पदरमोड करावी लागू नये याची काळजी घेतली जात असून प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था घरापर्यंत करण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी  सांगली जिल्ह्यातील विविध आगारातून १०० बसेस रवाना सोमवारी रवाना झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी या बस अगदी गावपातळीपर्यंत धावणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपु , तासगांव, विटा, जत ,  आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा पलूस या आगारातून १०० बसची व्यवस्था करण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत या बस कोल्हापूरमध्ये पोहचतील.

वर्धा जिल्हा ई-ऑफिस प्रणालीत ठरला राज्यात अव्वल

सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. सुरुवातीस आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये सुरू करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे.सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालय व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिसने जोडली गेली. सर्वस्तरावरील शासकीय कामकाज या प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली. तालुकास्तरावर सुरुवातीस आर्वी विभागातील तीन तालुक्यांमध्ये राबविल्यानंतर आता सर्व तहसीलमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे.

आता अमेरिकेत खास ‘मोदीजी थाळी’, न्यू जर्सीमधील रेस्तराँची चर्चा; ‘जयशंकर थाळी’चाही समावेश!

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दिल्लीतील एका रेस्तराँनं मोदींना समर्पित थाळी तयार केली होती. या थाळीचं नावच ‘५६ इंच’ असं ठेवण्यात आलं होतं. या थाळीत बरोबर ५६ पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका थाळीची जोरदार चर्चा रंगली आहे. या थाळीचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने न्यू जर्सीमधील एका रेस्तराँनं ‘मोदीजी थाळी’ तयार केली आहे. या थाळीचं लवकरच अनावरण करण्यात येणार आहे. याचबरोबर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या नावाने ‘जयशंकर थाळी’चाही या रेस्तराँनं समावेश केला आहे.

 चक्रीवादळ दिशा बदलणार? पाकिस्तान नव्हे, आता गुजरातच्या दिशेनं वळवला मोर्चा

अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अत्यंत तीव्र रुप धारण केलेले हे वादळ आता आपली दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. कारण हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातच्या किनारपट्टीकडे थोडेसे पूर्वेकडे हे वादळ सरकण्याचा अंदाज आहे. तसंच १५ जून रोजी येथे भूकंपाचा धोकाही संभवतो. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.“दिशा बदलल्याने गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर २-३ मीटरचे वादळ निर्माण होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच, शेती फळबागांच्या नुकसानीचीही भीती आहे. रेल्वे, पॉवरलाईन, सिग्नलिंग यंत्रणाही बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे”, असं प्रादेशिक विशेष हवामान केंद्राच्या (RSMC) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

‘इंडिगो’चे विमान भरकटून पाकिस्तानात

अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान खराब हवामानामुळे भरकटून पाकिस्तानात लाहोरनजिक गेले आणि गुजरानवालापर्यंत जाऊन कुठल्याही अपघाताशिवाय भारतीय हद्दीत परत आले.फ्लाइट रडारनुसार, ४५४ नॉट इतका वेग असलेले एक भारतीय विमान शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लाहोरच्या उत्तरेकडे शिरले आणि रात्री ८ वाजून १ मिनिटांनी भारतात परतले, असे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. इंडिगो एअरलाइन्सने यावर तत्काळ काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मणिपूरमध्ये ५० हजार लोक शिबिरांच्या आश्रयाला 

मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे विस्थापित झालेले ५० हजारांहून अधिक नागरिक राज्यभरातील ३४९ मदत शिबिरांत राहत आहेत. राज्याचे माहिती व जनसंपर्क मंत्री व राज्य सरकारचे प्रवक्ते डॉ. आर. के. रंजन यांनी रविवारी सांगितले की, सर्व जिल्ह्यांत विशेषत: संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत ५३ शस्त्रे आणि ३९ बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.रंजन यांनी सांगितले, की या हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच जाहीर केला जाईल. या हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या एकूण ५० हजार ६९८ नागरिकांनी सध्या ३४९ मदत शिबिरांत आश्रय घेतला आहे. विशेषत: महिला, वृद्ध आणि मुलांसाठी उघडलेल्या मदत केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी दरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ३७ द्वारे विविध वस्तूंची राज्यात आणल्या जात आहेत.

“भाजपा आपली राजकीय मस्ती दाखवायला…”, वारकरी लाठीमारप्रकरणी संजय राऊतांचा संताप

आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना काल (११ जून) पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.संजय राऊत म्हणाले की, “पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली. ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे. आळंदीच्या वारीचं नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं. देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसं जावं याचं नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दृढाचार्य तिथे बसून करत होते. यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी, ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे. राजकीय टग्यांची नाही. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतंय, त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारुच शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

MHT CET परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार होता. मात्र त्या आधीच हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर केला आहे. निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील.

यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या संकेतस्थळवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.यूपीएससी २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार दरवर्षीप्रमाणे रविवार २८ मे ला पूर्व परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रांत ही परीक्षा झाली. पहिल्या सत्रात सामान्य अध्ययनावर आधारित परीक्षा झाली, तर दुसऱ्या सत्रामध्ये सी-सॅटचा पेपर घेण्यात आला. या दोन्ही सत्रांतील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

फ्रेंच ओपन २०२३ मध्ये जोकोविचने मारली बाजी!

फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचने चौथ्या क्रमांकाच्या रुडचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला. त्याने हा सामना ७-६ (७-१), ६-३, ७-५ असा जिंकला. सर्बियन खेळाडूने फ्रेंच ओपन जिंकून इतिहास रचला. तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरला. जोकोविचच्या नावावर २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. यात त्याने स्पेनच्या राफेर नदालला (२२) मागे टाकले. स्वित्झर्लंडचा निवृत्त महान खेळाडू रॉजर फेडरर २० वेळा चॅम्पियन बनला.

IPLचे भारतीय ‘हिरो’ WTC Finalमध्ये ‘झिरो’

भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 332 धावा काढल्या होत्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. तर WTC फायनलमध्ये मात्र दोन्ही डावात मिळून 58 धावाच करता आल्या.सर्वाधिक धावा करणारा युवा फलंदाज शुभमन गिल WTC फायनलमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याने फायनलमध्ये केवळ 31 धावा केल्या. आयपीएलमध्ये 17 डावात ३ शतके, 4 अर्धशतके झळकावताना 890 धावा काढल्या होत्या.भारताची नवी भिंत अशी ओळख असणारा पुजारा दोन्ही डावात मिळून फक्त 41 धावाच करू शकला.WTC फायनलमध्ये इतरांच्या तुलनेत अजिंक्य रहाणेने समाधानकारक फलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात 135 धावा केल्या. आयपीएलमध्ये 2 अर्धशतकासह त्याने 11 डावात 326 धावा केल्या होत्या.

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अपडेट! ‘या’ दिवशी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान भिडणार

वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2023 बाबत मोठी बातमी समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 या महिन्यांमध्ये भारतात होणाऱ्या या स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनल मॅच 19 नोव्हेंबर 2023 ला होणार आहे. याशिवाय, जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहत असलेली या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रविवारी (11 जून 2023) भारतीय क्रिकेट टीमचा पराभव झाला. भारतीय क्रिकेट टीम गेल्या 10 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2011 पासून भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेतील पहिली मॅच 5 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. याच मैदानावर स्पर्धेतील फायनल मॅच 19 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.