आज दि.१४ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दिल्लीत वेगवान घडामोडी, शिंदे-फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे अमित शाह यांच्या निवासस्थानी सीमाप्रश्न सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावरून विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून विशेष विमानाने दिल्लीला गेले आहेत.

शिंदे-फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्तार ठरणार! ‘कॅबिनेट’साठी या नेत्यांची नावं चर्चेत!

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,या बैठकीनंतर शिंदे-फडणवीस आणि अमित शाह यांच्यात राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून कोण शपथ घेणार याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू तसंच शिंदे गटाकडून संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बालाजी किणीकर, किशोर पाटील, सदा सरवणकर यांची नावं आघाडीवर आहेत.

भाजपकडून प्रसाद लाड, अमरिष पटेल, जयकुमार रावल, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, राहुल कुल, कृपाशंकर सिंग, संभाजी पाटील निलंगेकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

ठाकरेंचा आणखी एक आमदार अडचणीत! एसीबीकडून साडेचार तास चौकशी

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण या आमदाराची आज तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. राजन साळवी हे आज सकाळी 11.30 वाजता चौकशीसाठी यानंतर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.नगरसेवकपदापासून ते आमदार होईपर्यंतची कारकीर्द आणि संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न तसंच मालमत्तेबाबतची सविस्तर माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं. एसीबीने तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, मात्र लोटे-परशुराम येथील सनी नलावडे याने तक्रार केल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला आहे. तसंच त्याचा समाचार आपल्या पद्धतीने घेऊ, असा इशाराही राजन साळवी यांनी दिला.

Fractured Freedom पुस्तकामुळे वाद शिगेला, प्रज्ञा पवारांनंतर आणखी एका मोठ्या साहित्यिकाचा राजीनामा

Fractured Freedom या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार काढून घेतल्यानंतर लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फेसुबकवर त्यासंदर्भातील पत्र पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील मोठं नाव माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही राजीनामा दिला आहे.कोबाड गांधी पुस्तकाचा पुरस्कार रद्द केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेलं राजीनामा सञ वाढतंच चाललंय. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही याच मुद्यावरून सरकारविरोधात आपली नाराजी प्रगट करण्यासाठी भाषा सल्लागार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याआधी ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा पवार, कवयित्री नीरजा यांनीही शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचे राजीनामे दिले आहेत.

30 वर्षीय मुलीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ! निर्णयाने वडील नाराज आईने दिली साथ

भारतीय समाजात नवऱ्याला देव मानणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत; पण देवालाच नवरा मानून त्याच्याशी संसार थाटण्याची स्वप्न पाहणं हा सध्याच्या काळात वेडेपणाच समजला जाईल. जयपूरमधल्या 30 वर्षांच्या तरुणीने चक्क श्रीकृष्णासोबत लग्नगाठ बांधून संसार सुरू केलाय. तिचं हे पाऊल अनेकांना विचित्र वाटत असलं, तरी पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादविवादांमुळे तसं केल्याचं तिने सांगितलं.राजस्थानातल्या जयपूरमधल्या पूजा सिंहचं लग्न 8 डिसेंबरला झालं. 300 जणांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला; मात्र नवरदेव म्हणून ठाकूरजी अर्थात साक्षात श्रीकृष्ण होते. एखाद्या सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न करून संसार थाटण्याचं वय असताना श्रीकृष्णासोबत लग्न करणं ही गोष्ट सध्याच्या काळात विचित्र वाटते; मात्र तसं करण्यासाठी काही कारणं असल्याचं पूजा सांगते. “लग्नाचं वय झाल्यावर आमच्याही घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. काही स्थळंही येत होती; मात्र मी आजवर अनेक दाम्पत्यांमधली भांडणं पाहिली आहेत. अशा घटनांमध्ये बायकोला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. त्यामुळे मी मोठं झाल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला,” असं पूजा म्हणते. आई-वडिलांना निर्णय सांगितला होता; मात्र लग्नाचं वय झाल्यावर लग्न करायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. एक-दोनदा मुलगा पाहण्याचा कार्यक्रमही झाला. मग आलेल्या स्थळांना नकार देऊन लग्न न करण्याची इच्छा व्यक्त केली, असं ती म्हणाली.

महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामुळे सध्या वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता महेश मांजरेकर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांना एका अपघातात आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकरांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली असा आरोप केला जात आहे. महेश मांजरेकरांचा अपघात झालेला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाची होती. यावेळी महेश मांजरेकरांनी अरेरावी करत  संस्थाचालकांविरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.

राज्यात थंडी परतणार

राज्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून असलेले पावसाचे सावट आता पूर्णपणे कमी झाले आहे. पुढील दोन दिवसांत थंडी हळूहळू वाढणार आहे. सध्या राज्यातील सर्वच भागातील किमान तापमान चढेच (सरासरीपेक्षा जास्त) असल्याचे दिसून येत असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे १५.२ अंश सेल्सिअस करण्यात आली. उत्तर भारतातील पंजाब राज्यात १७ आणि १८ डिसेंबर रोजी शीतलहर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीत १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला

दिल्लीमध्ये अ‍ॅसिड हल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. द्वारका परिसरामध्ये घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पीडित मुलगी रस्त्याच्या कडेने चालत असताना समोरुन एका दुचाकीवर दोनजण आले. त्यांनी या मुलीजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी केला आणि त्याचवेळी मागे बसलेल्या व्यक्तीने या मुलीवर अ‍ॅसिड फेकलं. अगदी क्षणार्धात हा सारा प्रकार घडला. आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मुलगी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून पळताना दिसत आहे.

श्रेयस अय्यरने रचला इतिहास! भारताने पहिल्या दिवसअखेर केल्या २७८ धावा

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने बुधवारी (१४ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात केली. रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. टीम इंडियाने बुधवारी सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मोठ्या काळानंतर देशासाठी खेळला असून त्याने शानदार फलंदाजी केली मात्र तो शतकापासून वंचित राहिला. तर बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेत बाहेर असलेला ऋषभ पंत याने पहिल्याच कसोटीत संघात पुनरागमन केले आहे.पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या सहा गडी गमावून २७८ अशी झाली आहे. श्रेयस अय्यर सध्या ८२ धावांवर खेळत आहे, तर रविचंद्रन अश्विन अद्याप फलंदाजीला आलेला नाही. यानंतर तळाचे फलंदाज सुरू होतील. अश्विन दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरसह फलंदाजीसाठी उतरेल आणि भारतीय संघ ३५० धावांच्या जवळपास धावा करण्याचा प्रयत्न करेल.

अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या वाटेवर, रणजी पदार्पणातच झळकावले शतक

दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या सचिन तेंडुलकरला चाहत्यांनी क्रिकेटमधील देवाचा दर्जा दिला आहे. त्याचा मुलगा अर्जुन हा देखील क्रिकेटपटू आहे पण तो फलंदाजीपेक्षा गोलंदाजीसाठी अधिक ओळखला जातो. मंगळवार, १३ डिसेंबर हा दिवस वडील सचिनसाठी खूप खास होता कारण या दिवशी मुलाने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने धमाल खेळी केली आणि आपली छाती अभिमानाने वाढवली.अर्जुनने मंगळवारी (१३ डिसेंबर २०२२) गोवा रणजी संघासाठी प्रथम श्रेणी सामना खेळला. मुंबईतून निवड झाल्यानंतर, तो लिस्ट ए आणि टी२० मध्ये संघासाठी खेळला पण गोवा संघासाठी त्याने प्रथम श्रेणी पदार्पण केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्याच सामन्यात त्याने दडपणाखाली येऊन अशी खेळी खेळली ज्यामुळे त्याचे पदार्पण संस्मरणीय ठरले. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १७८ चेंडू खेळून आपले शतक पूर्ण केले.

लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा, फायनल ठरणार अंतिम सामना

अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचाही शेवटचा सामना असणार आहे. मेसीने या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मेसीने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले असून, अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. मेसीच्या नावावर आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ११ गोल केल्याचा रेकॉर्ड आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.