तातडीच्या याचिकांवर सुनावणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज बुधवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने चालवण्यात येणार आहे.
मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाची प्रशासकीय समिती आणि वकिलांच्या संघटनेची सोमवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रकरणे प्रत्यक्ष पद्धतीने, तर दिवाणी प्रकरणे ऑनलाइन पद्धतीने चालवली जातील. तर मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायदालनाचे कामकाज प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने चालवले जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. खासगी कार्यालये बंद ठेवण्याच्या आणि जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर वकील व न्यायालयीने कर्मचाऱ्यांना मुभा देण्याबाबत महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, काही न्यायमूर्तींनी कामकाज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने वा प्रत्यक्ष व दोन्ही पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली आहे.