“महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
कोरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून आदेश लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे.
राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे.
मागील वर्षीही कोरोनाचं थैमान सुरू होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला आंबेडकरी जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यंदा पुन्हा आंबेडकर जयंती तोंडावर असतानाच राज्यात कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. त्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.