बांगलादेशातील पोलिसांनी एका शिक्षकाकडून 1,000 वर्षांहून जुनी भगवान विष्णूंची काळ्या दगडाची मूर्ती जप्त केली आहे. ‘डेली स्टार’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी ही मूर्ती क्युमिला जिल्ह्यातील बोरो गोआली या गावातून जप्त केली आहे.
काळ्या दगडात कोरलेल्या या भगवान विष्णूच्या मूर्तीची उंची सुमारे 23 इंच आणि रुंदी 9.5 इंच इतकी आहे. या मूर्तीचे वजन सुमारे 12 किलो आहे. दाउदकंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नजरूल इस्लाम म्हणाले, “अबू युसूफ नावाच्या शिक्षकाला दीड महिन्यापूर्वी ही मूर्ती सापडली होती, पण त्याने आम्हाला माहिती दिली नाही. एका गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सोमवारी रात्री त्याच्या घरातून ती मूर्ती जप्त केली.
युसूफ याबाबत म्हणाला की, ‘मी ही मूर्ती 20-22 दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढताना पाहिली. आम्ही कामात व्यस्त असल्याने आम्ही पोलिसांना कळवू शकलो नाही. चट्टोग्राम विभागीय पुरातत्व विभागाचे माजी प्रादेशिक संचालक अताउर रहमान म्हणाले की, “भगवान विष्णूची ही मूर्ती अत्यंत मौल्यवान आहे. ही मूर्ती कदाचित 1,000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. योग्य संरक्षणासाठी तातडीने ती मूर्ती मैनामती संग्रहालयाकडे सोपवली पाहिजे. (फोटो क्रेडिट गुगल)