बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य…. दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला. आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे की ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल. १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ मधील वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसऱ्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नसत. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती. प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा. २०१९ मध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. या फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. ऋषीकपूर यांचे ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर ,पुणे