टीम इंडियानं पाकिस्तानपाठोपाठ हाँगकाँगचा पराभव करुन आशिया चषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह टीम इंडियानं ब गटात अव्वल स्थान निश्चित केलं. त्याचबरोबर सुपर फोर फेरीतही प्रवेश केला. या सामन्यात भारतानं हाँगकाँगसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हाँगकाँगला 20 षटकात 5 बाद 152 धावाच करता आल्या. त्यामुळे भारतानं 40 धावांनी विजय साजरा केला.
193 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या बाबर हयात आणि किंचित शाहनं भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. बाबरनं 41 तर शाहनं 30 धावा केल्या. पण इतर फलंदाजांना फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा, अर्शदीप सिंग आणि आवेश खाननं एकेक विकेट घेतली.
सूर्या-विराटची दमदार फलंदाजी
त्याआधी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं 20 षटकात 2 बाद 192 धावांची मजल मारली होती. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुलनं 38 धावांची सलामी दिली. रोहित सेट होत असतानाच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि राहुल या जोडीनं 56 धावांची भागीदारी केली. राहुल 36 धावा काढून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र विराटनं सूर्यकुमारच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 98 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. विराटनं नाबाद एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. तर सूर्यकुमारनं 26 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 68 धावा फटकावल्या.
विराटचा नवा विक्रम
या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा मान रोहित शर्माकडे होता. रोहितनं आजवर 31 अर्धशतकं झळकावली आहेत. पण आज विराटनं रोहित शर्माची बरोबरी केली. हाँगकाँगविरुद्ध त्यानं केलेलं अर्धशतक हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधलं 31 वं अर्धशतक ठरलं. त्यामुळे आता सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराट आणि रोहित संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.